विविध रक्त चाचण्या होणार अधिक वेगाने; रुग्णांना मोठा दिलासा
ठाणे – सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला अत्याधुनिक अशा दोन `मॅग्लुमी ८०० व ‘मॅग्लुमी’ २००० सीएलआयए विश्लेषक’ मशीन सीएसआर उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण आज ठाणे मनपा सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्या हस्ते झाले. या मशीनमुळे रुग्णालयातील रक्त निदान क्षमता अधिक वेगवान आणि परिणामकारक होणार असून हजारो रुग्णांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
यावेळी शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, नगरसेवक मिलिंद पाटील, मा. नगरसेविका मनाली पाटील, नगरसेवक गणेश कांबळे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका चंद्रकांता साळवी, शाखाप्रमुख रवींद्र पाटील, समाजसेवक जगदीश भोईर, किशोर भोईर, मिलिंद सिन्नरकर, राधे वराडकर, निनाद बोराडे, रोहन शिंदे, मा. नगरसेवक सचिन म्हात्रे आदी उपस्थित होते.
‘मॅग्लुमी’ ८०० आणि ‘मॅग्लुमी’ २००० या दोन्ही मशीन पूर्णपणे स्वयंचलित (फुली ऑटोमेटिक) असून त्यांची तपासणी क्षमता अत्यंत वेगवान आहे. एका तासात सुमारे २०० चाचण्या करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. तसेच एकाच वेळी ४० रुग्णांचे नमुने तपासता येणार आहेत. कर्करोग, थायरॉईड, ट्युमर यांसारख्या गंभीर आजारांच्या चाचण्या अधिक अचूक आणि जलद पद्धतीने करता येणार असल्याने रुग्णांच्या उपचार प्रक्रियेला मोठी मदत होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात. हे रुग्णालय सर्व सुविधांनी परिपूर्ण असावे, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी सांगितले.
“डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांनी दिलेल्या या दोन मशीनमुळे रुग्णालयाची सेवा अधिक सक्षम होईल. मात्र मशीन सातत्याने कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांना या सुविधेचा पूर्ण लाभ मिळू शकेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या मशीनमुळे ठाणे महापालिका रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून सर्व स्तरांतून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

