ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या टीएमसी विधी महाविद्यालयाचा ५१ व्या बॅचचा विधी पदवी प्रदान सोहळा शनिवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाविद्यालयाच्या प्रांगणातील पाणिनी सभागृहात आयोजित या समारंभाला विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची, माजी विद्यार्थ्यांची आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रीविद्या जयाकुमार यांनी स्वागतपर भाषण करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. त्यांनी महाविद्यालयाच्या ५४ वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत, अनेक यशस्वी न्यायाधीश, वकील व कायदेतज्ज्ञ घडविण्यात महाविद्यालयाने बजावलेली भूमिका अधोरेखित केली.
या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या मा. न्यायमूर्ती श्रीमती शर्मिला देशमुख आणि ठाणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. एस. बी. अग्रवाल उपस्थित होते. त्यांच्या हस्ते एकूण १५० विद्यार्थ्यांना विधी पदव्या प्रदान करण्यात आल्या. संस्थेच्या परंपरेप्रमाणे सर्व अतिथी आणि पदवीधर विद्यार्थ्यांनी लाल रंगाची पगडी आणि उपरने परिधान करुन पदवी स्विकारली. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी महिलांच्या विधी क्षेत्रातील वाढत्या सहभागाचे स्वागत करत, अधिकाधिक महिला वकिलांनी न्यायव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, आजच्या काळात महिलांकडे नेतृत्वगुण, विश्लेषण क्षमता आणि संवेदनशीलता आहे, ज्यामुळे त्या न्यायव्यवस्थेत प्रभावी भूमिका बजावू शकतात. वकीली व्यवसायात नवनवीन संधी निर्माण होत आहेत, त्यात ही संधी शोधण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. एस. बी. अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक आयुष्यात प्रामाणिकपणा, संयम आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा सल्ला दिला. “वकिली हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे माध्यम आहे. त्यामुळे शॉर्टकट टाळून परिश्रम, नैतिकता आणि कायद्याचे भान ठेवून काम केल्यासच दीर्घकालीन यश मिळते,” असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, श्री. सुधारक आगरकर, श्री. रविंद्र रसाळ आणि श्री. दिलीप जोशी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. विजय बेडेकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ व्यावसायिक प्रगतीच नव्हे तर समाजाप्रती जबाबदारीही पार पाडावी, असे आवाहन केले. या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विविध विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णा कामथ यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विनोद एच वाघ यांनी केले.

