ठाणे :- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दि.१३ सप्टेंबर २०२५ रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ चे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवता येतील. संबंधितांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी व राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घेण्यासाठी येत्या शनिवार, दि.१३ सप्टेंबर, २०२५ रोजी आयोजित केलेल्या लोकअदालतीमध्ये आपली प्रकरणे ठेवावीत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रविंद्र पाजणकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
लोक अदालतच्या निवाडयाविरुध्द अपील नाही,
एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते, खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपआपसात समजुतीने होत असल्याने कुणाची हार वा जीत होत नाही. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो, परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकअदालतीत होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते, वेळ पैसा यांची बचत होते, इतकेच नव्हे तर लोक अदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फिची रक्कम परत मिळते. लोकअदालतचे महत्व लक्षात आल्याने यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून राष्ट्रीय लोकअदालतचा फायदा पक्षकारांना मिळाला आहे.