जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ मार्गदर्शन कार्यशाळा

दि. ११ ऑगस्ट (जिल्हा परिषद, ठाणे) – पानी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ या स्पर्धेबाबत माहिती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद, ठाणे येथे करण्यात आले. ही कार्यशाळा दि. ११ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १२.०० वा. समिती सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय, ठाणे येथे पार पडली.

      "‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा" सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी गट शेती करून शाश्वत व नैसर्गिक शेती पद्धतींकडे वळवून त्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढवणे, तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणे हा आहे. ही  स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असून ठाणे जिल्ह्यात तो यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना केले. 

        कार्यशाळेत माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे नामदेव ननावरे, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे,  कृषी विकास अधिकारी एम.एम. बाचोटिकर, विभागीय समन्वयक (पानी फाउंडेशन) विक्रम फाटक, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापक, उप अभियंता (ग्रा. पा. पु.) आणि पंचायत समित्यांतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

        डॉ. अविनाश पोळ यांनी ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’चे उद्दिष्ट, सहभागाची पद्धत, लाभ आणि पारितोषिकांची माहिती सविस्तर दिली. त्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, उत्पादनवाढ, नफावाढ आणि जैविक शेतीच्या दिशेने होणारे सकारात्मक बदल यावर भर दिला. प्रत्येक तालुक्यातून १०० शेतकऱ्यांना ३ दिवसीय निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांना , महिलांचे शेतकरी गटाना राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय  पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.

        जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले असून, उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी स्पर्धेत अधिकाधिक शेतकरी गटांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top