ठाणे :एसटी महामंडळ त्यांच्या बसस्थानकांना सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे.महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेस च्या वतीने ठाणे रेल्वे स्थानका जवळीक बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी एसटीचे खासगीकरण बंद करा, एसटीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.
ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एसटी आगार खाजगीकरणासह आगारातील खड्ड्यांचे साम्राज्य ,स्वच्छता गृहांची दुरावस्था,बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे,महामंडळांच्या कार्यालयाची दुरावस्था याकडे एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले.यावेळी काँग्रेस च्या वतीने सिमेंट मिक्सर वाहने आणून काँक्रीटीकरण करत आगारातील खड्डे बुजविण्यात आले.
या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले की ठाणे आगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे. आतापर्यंत शहरात कोट्यावधी रुपये काँक्रिटीकरण व डांबरीकरणावर खर्च करण्यात आले परंतु शहरातील बस स्थानक दुर्लक्षित का..? तसेच एसटी स्थानके भाडेतत्वावर देत खाजगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्याच शहरात एसटी प्रवाशांना मूलभूत सोयी – सुविधा पुरवू शकत नाही ही खेदाची बाब आहे.याप्रसंगी ठाणे काँग्रेस चे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे,हिंदुराव गळवे यांच्या सह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
