उथळसरमध्ये वारली संस्कृती अन् परंपरेचा जागर महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबची जिव्या सोमा म्हसे यांना मानवंदना

उथळसरमध्ये वारली संस्कृती अन् परंपरेचा जागर

एक वही , एक पेन अभियानातून आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ठाणे – ठाणे आणि पालघर जिल्ह्याची ओळख ही वारली चित्रशैलीने जगभर पसरली आहे. जिव्या सोमा म्हसे यांनी वारली कलेला जगन्मान्यता मिळवून दिली असली तरी मूळ ठाणेकरांना आदिवासींची वारली कला, त्यांचे घर, घरातील साहित्य याची ओळख करून देण्यासाठी उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश भंडारी यांच्या पुढाकारातून वारली संस्कृती आणि कलेचा जागर करणारा देखावा तयार करण्यात आला आहे.

महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गेली 53 वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. जनार्दन वैती यांनी या गणेशोत्सवाची स्थापना केली होती. योगेश भंडारी यांच्या अध्यक्षतेखालील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सवासह सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आघाड्यांवर काम करीत आहेत. दरवर्षी या मंडळाच्या वतीने वैविध्यपूर्ण देखावे तयार करण्यात येत असतात. यंदा या मंडळाने वारली चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आदिवासी झोपडीचा देखावा साकारला आहे. या झोपडीच्या कुडांवर (कारवीच्या भिंती) नैसर्गिक रंगात चितारलेली चित्रे, झाडे, वन्यजीव यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे, पूर्वीच्या काळी आदिवासींच्या घरात असलेला प्रकाशासाठीचा टेंभा रात्रीच्या प्रकाशात अधिकच मनमोहक वाटत आहे. हा देखावा बघण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे.
दरम्यान, या मंडळाच्या वतीने आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबविण्याची मोहिम वर्षभर राबविण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून श्री गणरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना फळे, फुले, नारळ आणण्याऐवजी एक वही आणि एक पेन घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमा झालेल्या या शैक्षणिक साहित्यात अधिकची भर घालून हे साहित्य आदिवासी पाड्यांतील शाळांमध्ये वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष योगेश भंडारी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top