राज्याचा विकास करणाऱ्या वारकऱ्यांची गरज-एकनाथ शिंदे
ठाणे: राज्याचा विकास करणाऱ्या वारकऱ्यांची महाराष्ट्राला गरज असून विकासाचे मारेकरी नकोत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिदि यांनी विरोधकांवर केली. मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर पांडुरंगाचा निस्सिम भक्त म्हणून आलो असून या भक्ताच्या हस्ते पांडुरंगाच्या मूर्तीचे लोकार्पण झाले हे मी माझे भाग्य समजतो, अशी भावना श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलाव येथे पांडुरंगाच्या 57 फुटी उंच मूर्तींचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे आई-वडील हे वारकरी आहेत.
लहानपणी आम्ही पंढरपूर येथे जात होतो. पांडुरंगाची निस्सिम भक्ती आम्ही करतोय, म्हणूनच शास्थाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य मला मिळाले, ती सर्व पांडुरंगाची कृपा असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले. ठाणे शहराचा आणि राज्याचा विकास आमच्या सरकारने केला, आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडले नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. लाडकी बहीण योजनेतून आम्ही बहिणींना मदत करत आहोत. या राज्याला विकासाकडे घेऊन आणारे वारकरी पाहिजेत. विकासाचे मारेकरी नकोत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रस्तावना केली. त्यांच्या मतदारसंघात चार ठिकाणी विठ्ठलाची भव्य मूर्ती उभारण्यात येणार असल्याचे सांगितले उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भरभरून निधी दिला त्यामुळे ठाण्यातील ही भव्य मूर्ती साकारुण्यात आली असल्याचे श्री. सरनाईक म्हणाले,
विठ्ठल नामाचा जयघोष, रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण यामुळे संपूर्ण उपवन परिसर शुक्रवारी मंत्रमुग्ध झाला होता. ठाण्यातील उपवन येथील
अहिल्यादेवी होळकर घाटावर उभारलेल्या ५७ फुटी उंच विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, खा. नरेश म्हस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर एच. एस. पाटील, परिषा सरनाईक, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

