ठाण्यात ‘नवदुर्गा वेलनेस सायकल राईड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : महिलांच्या आरोग्य आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी ठाण्यात रविवारी सकाळी आयोजित “नवदुर्गा वेलनेस सायकल राईड” उत्साहात पार पडली. उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या अनोख्या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने तीन हात नाका येथील तुळजाभवानी मंदिरापासून झाली. प्रमुख पाहुणे दिग्दर्शक व समाजसेवक किरण नाकती यांनी हिरवा झेंडा दाखवत राईडला शुभारंभ केला.

ही सायकल राईड तीन हात नाका – हरी निवास सर्कल – वंदना टॉकीज – गजानन महाराज मठ – राम मारुती रोड – गोखले रोड असा आकर्षक मार्गक्रमण करत अभिनय कट्टा (भास्कर कॉलनी) येथे संपन्न झाली. श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम पार पडला.

या प्रसंगी ७४ वर्षीय दुर्गा गोरे, ७० वर्षीय अरुणा लागू, ७२ वर्षीय शरद कुलकर्णी, ७७ वर्षीय आत्माराम सोनुर्लीकर आणि चिमुकला सायकलिस्ट सहर्ष जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अरुणा लागू यांनी आतापर्यंत तब्बल ८२ हजार किमी सायकलिंग पूर्ण केल्याची माहिती देत एक लाख किमीचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सायकलप्रेमींना रस्त्यावर सायकल चालविताना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबतही त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनला हातभार लावणारे महेश दाभोळकर, डॉ. वैशाली दोंडे, मुंबईचे सायकल महापौर व सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. विश्वनाथ अय्यर आणि आग्रा येथे सायकलिंगद्वारे यश मिळवणारे चंद्रशेखर जगताप यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. तसेच फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद ठरल्याने किरण आणि संध्या नाकती यांचा संस्थेच्या सदस्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या राईडमध्ये ८० हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग नोंदवला. आपल्या मनोगतात किरण नाकती आणि संध्या नाकती यांनी महिलांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी रोज थोडा वेळ सायकलिंग किंवा व्यायामासाठी राखावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात दत्तगुरु महाराजांच्या अभंगाने झाली. सर्व सहभागी सायकलप्रेमींना मेडल देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन आणि आभारप्रदर्शन आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका सदस्या प्रज्ञा म्हात्रे यांनी केले. संपूर्ण राईडमधून एकच संदेश घुमला – “फिट राहा, हिट राहा!” यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील यांचीही उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top