ठाण्याच्या ११४ वर्षीय आजीबाईनी घेतला अखेरचा श्वास
पाच पिढयांच्या साक्षीदार विठाबाई पाटील निर्वतल्या
ठाणे, :- सर्वांत वयोवृद्ध ११४ वर्षीय ठाण्याच्या विठाबाई दामोदर पाटील यांचे शनिवारी (ता.२५ ऑक्टो.) सकाळी सहा वाजता निधन झाले. पाच पिढ्यांच्या साक्षीदार असलेल्या या आजीबाईंनी आपल्या शतकपार आयुष्यातील अनेक बदल याची देही याची डोळा अनुभवले. विशेष म्हणजे, लोकशाहीवर अढळ विश्वास असलेल्या विठाबाई यांनी गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदानाचे कर्तव्य मतदान केंद्रात जाऊन पार पाडले. येत्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांना मतदान करण्याची इच्छा होती, मात्र तत्पूर्वीच नियतीने त्यांना काळाच्या पडद्याआड नेल्याची खंत त्यांचे कुटुंबिय तसेच गावकऱ्यांनी व्यक्त केली.
विठाबाई यांचा जन्म १९११ साली कल्याण प्रांतातील शिळगाव येथे झाला. विवाहानंतर त्या ठाणे पूर्वेकडील कोपरीगाव येथे स्थायिक झाल्या. आयुष्यभर आगरी-कोळी परंपरा आणि संस्कृतीचे मूल्य जपत त्यांनी तब्बल पाच पिढया घडवल्या. त्यांच्या पश्चात सहा मुले, सहा सुना, नातवंडे, पतवंडे असे भले मोठे कुटुंब आहे. ठाणे पूर्व येथील गावदेवी मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या त्या मातोश्री होत. शनिवारी सकाळी सहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर सकाळी ११ वाजता कोपरीतील वैकुंठधात स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. परंपरेनुसार त्यांना अखेरचा निरोप देताना भजन मंडळ, ब्रास बँड आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विठाबाईंच्या जाण्याने कोपरी गावावर एक युग संपल्याची भावना दाटून आली. त्यांना निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंबाबरोबर गावातील तमाम मंडळी जमली होती. दिलीप पाटील म्हणाले की, दरवर्षी काठी टेकत ती मतदान केंद्रात हजेरी लावत असे. त्यांना पाहण्यासाठी रांगेतील मतदार देखील थांबत असत. पारतंत्र्यातुन स्वातंत्र्य मिळालेला देश बदलला, अनेक सरकारे बदलली, तरी मतदान करून लोकशाही मुल्य जपण्याचा त्यांचा निर्धार कायम होता. कोणीही त्यांना भेटायला गेले की त्यांना त्या ओळखत असत. अशी ११३ वर्ष उलटुनही विठाबाई यांची स्मरणशक्ती मजबूत होती.

