लाडक्या बहिणी आणि ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, :- ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो ठाणे शहरात पार पडला. या रोड शोला लाडक्या बहिणींसह अबालवृद्ध नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.
विकास, आरोग्य, पाणी, गृहनिर्माण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा ठाम विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.
रोड शोदरम्यान बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ देणार नाही. सर्वसामान्य माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आरोग्य, पाणी, रस्ते आणि पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात येईल.”
यावेळी त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नांचा उल्लेख करत, “बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत,” असे सांगितले. तसेच उमेदवारी मागे घेतलेल्या कार्यकर्त्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवा, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.
रोड शोदरम्यान ठाण्यातील विविध भागांत नागरिकांनी शाल, पुष्पगुच्छ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल्लोषात स्वागत केले. जागोजागी महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले. अनेक ठिकाणी शिंदे यांनी वाहन थांबवून नागरिकांचे अभिवादन स्वीकारले. कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.
एकूणच, ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा रोड शो महायुतीसाठी शक्तिप्रदर्शन ठरला असून, आगामी निवडणुकीत ठाण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचे चित्र आहे.
……

