ठाणे जिल्ह्यात जनावरांच्या लाळ-खुरकूत (FMD) प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम सुरू

ठाणे दि. १६ (जिल्हा परिषद, ठाणे):- ठाणे जिल्ह्यातील पशुपालक, गोपालक आणि शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची मोहीम राबविण्यात येत आहे. २० व्या पशूगणनेनुसार जिल्ह्यात एकूण १,७२,०४३ जनावरे नोंदवली गेली असून, या जनावरांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी लाळ-खुरकूत (FMD) लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन मुंबई डॉ. प्रशांत कांबळे यांच्या विशेष मार्गदर्शनाने लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

      जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये लाळ-खुरकूत रोग प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पशुपालकांना आपल्या जनावरांचे लसीकरण करण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय केंद्राशी संपर्क साधून ही सुविधा घेता येणार आहे. या मोहिमेचा उद्देश जनावरांना रोगमुक्त ठेवणे, त्यांची उत्पादनक्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हा आहे.

      या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी यांनी सांगितले की,

“ही लस ३ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या सर्व निरोगी वासरे, बैल, रेडे, गायी-म्हशी तसेच गाभण जनावरांना देता येते. पशुपालकांनी अजिबात विलंब न करता आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. रोग प्रतिबंधक उपाययोजना राबविणे ही केवळ शासकीय जबाबदारी नसून सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे.”

      डॉ. जोशी यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल आणि ठाणे जिल्ह्यातील पशुधन अधिक निरोगी व सक्षम बनेल. एकत्रित प्रयत्नांमुळे ठाणे जिल्हा रोगमुक्त आणि आरोग्यदायी पशुधन असलेला आदर्श जिल्हा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top