ठाणे : मुका बहिरा आणि बौद्धिक मर्यादा असलेल्या ताहीरवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात अत्यंत अवघड मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. खासगी रुग्णालयांनी नकार दिलेल्या ताहीरच्या जीवनात पुन्हा प्रकाश आणण्यात ठाणे सिव्हिलने माणुसकीचा हात पुढे केला आहे.
भिवंडीतील ४५ वर्षीय ताहीर अन्सारी जन्मतःच बोलणे ऐकायला येतं नव्हते. परिस्थिती समजण्याची क्षमता कमी असल्याने कोणतेही वैद्यकीय उपचार करताना कुटुंबीय आणि डॉक्टर दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या सहा महिन्यांपासून त्याची दृष्टी धूसर होत गेली आणि दोन्ही डोळ्यांना गंभीर मोतीबिंदू झाल्याचे निदान झाले.
खासगी रुग्णालयांनी शस्त्रक्रिया धोकादायक असल्याचे सांगत हात वर केले. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयाने ताहीरची संपूर्ण तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया तातडीने करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेच्या वेळी ताहीर सतत हलत असल्याने ही अक्षरशः तारेवरची कसरत होती. एक चुकीची हालचालही डोळ्याच्या कायमस्वरूपी नुकसानाला कारणीभूत ठरू शकली असती. तरीही टीमच्या संयम, अचूकता आणि कौशल्यामुळे प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली असल्याचे नेत्र तज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी सांगीतले.
*
“रुग्ण कसंही असला तरी, योग्य नियोजन आणि टीमवर्क असेल तर उपचार शक्य होतात. ताहीरची शस्त्रक्रिया आमच्या वैद्यकीय टीमच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे,” —
डॉ. कैलास पवार, (जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे)
*
भिवंडीत अनेक नेत्रतज्ज्ञांनी ताहीरच्या डोळ्यांबद्दल नकार दिला. परतू
ठाणे सिव्हिल रुग्णालयाने ज्या आपुलकीने उपचार केले आणि त्याची हरवलेली दृष्टी पुन्हा आणली यासाठी रुग्णालयाचा सदैव ऋणी राहीन.
(अन्सार अहमद अन्सारी, ताहीरचे वडील)

