‘स्वच्छ हवेसाठी सर्व यंत्रणांना हवा नागरिकांचा सक्रिय सहभाग’ अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी

अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे प्रतिपादन
ठाणे महापालिका मुख्यालय येथे आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनानिमित्त झाली कार्यशाळा

    *ठाणे (१२) :* वायू प्रदूषण कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा प्रयत्नशील असतात. नागरिकांनीही त्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. म्हणजे सगळ्यांच्या योगदानातून हवा स्वच्छ राखणे शक्य येईल, असे प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले. 

    घरच्या घरी कचऱ्याचे नियोजन करणे, सार्वजनिक वाहनांचा वापर करणे, झाडे लावणे व त्यांची काळजी घेणे अशा गोष्टींमधून सर्वसामान्य नागरिक आपापल्या परीने हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नात मदत करू शकतात. कोणतेही अभियान जेव्हा नागरिकांमार्फत पुढे नेले जाते तेव्हाच त्याला यश मिळते, असेही अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केले. तसेच, ठाणे महानगरपालिकेतर्फे महाविद्यालय व शाळा यांच्यामध्ये माझी वसुंधरा अंतर्गत इ प्रतिज्ञा आणि त्यांची पूर्तता या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. जास्तीत जास्त प्रतिज्ञांची नोंदणी करणाऱ्या महाविद्यालयांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती लवकरच माहिती पर्यावरण विभागातर्फे देण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

   मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी वायू प्रदूषण कमी करण्यासह हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा केला जातो. या वर्षी या दिवसाची संकल्पना, रेसिंग फॉर एअर म्हणजेच स्वच्छ हवेसाठी कृती आणि सामूहिक प्रयत्तांना गती ही आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. तसेच, राज्याच्या कृती आराखड्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रासाठीही कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

     महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या या कार्यशाळेत राज्य हवामान कृती कक्षाचे संचालक अभिजीत घोरपडे यांनी नागरी क्षेत्रासाठी हवामान कृती आराखडा याबद्दल मार्गदर्शन केले. नागरी भागातील आव्हाने आणि त्यांचा सामना करण्यासाठी योजण्यात आलेल्या उपायांची माहिती त्यांनी दिली. ठाणे महापालिकेने तयार केलेल्या उष्णता कृती आराखड्याचेही त्यांनी कौतुक केले. 

  तसेच, नागरी विभागातील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी रस्त्यांची स्थिती, वाहतूक व्यवस्थापन, बांधकामांचे नियोजन आदी उपाययोजना आवश्यक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाचे उप प्रादेशिक अधिकारी संजीव रेडासनी यांनी सांगितले. महावितरण कंपनीतील कार्यकारी अभियंता अविनाश रणदिवे आणि सहाय्यक अभियंता किशोर सावरकर यांनी सौर उर्जेचा वापर वाढवण्याची आवश्यकता सांगितली. ठाण्यात १००० सोसायट्यांनी प्रधानमंत्री सर्यघर योजनेत सौर पॅनल बसविल्याचेही त्यांनी सांगितले. 

    तर, सोमय्या महाविद्यालयातील पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. निलेश वाघ यांनी नागरी सहभागाचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर, ठाणे महापालिकेच्या उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी महापालिकेतर्फे हवा प्रदूषण रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपायांची माहिती दिली.

     या कार्यशाळेस, उपायुक्त (उद्यान, पर्यावरण) मधुकर बोडके, उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे, उपनगर अभियंता गुणवंत झांब्रे आणि शुभांगी केसवानी आदी उपस्थित होते. 

     या कार्यशाळेत, विविध पर्यावरणपूरक स्पर्धेत पारितोषिके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कचऱ्यापासून कला निर्मिती या गटात अर्थव पवार, रुचिता पांचाळ, विराट काटे, निविदा पगार यांना पारितोषिक मिळाले. शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याच्या गटात निविदा पगार, विहान सपकाळ, रुचिता पांचाळ यांना पारितोषिक मिळाले. तर, बीज गोळे निर्मिती स्पर्धेत कृतिका घोलप, आदित्य चाकोले, निर्मला राठोड यांना पारितोषिक मिळाले. तसेच, कागदी लगद्यापासून मूर्ती बनविण्याच्या स्पर्धेत संघपाल कांबळे, रिया खरात, सिद्धेश चव्हाण यांना पारितोषिक मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण दूत म्हणून गौरव करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top