ठाणे स्थानकातील स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
ठाणे,दि. ३० (प्रतिनिधी)
देशातील लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या मत चोरीच्या घोटाळ्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेसने निर्देशित केल्यानुसार ठाणे शहर काँगेसद्वारे गुरुवारी राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष ॲड विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक सॅटीस परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी “वोट चोर गद्दी छोड” “संविधानाचा करताना घात, भाजप सापडला रंगेहाथ” ” पापाचा घडा भरला,भाजप वोट चोर ठरला” अशा घोषणांसह फलक देखील झळकवण्यात आले. या मोहिमेत तब्बल ३० हजाराहुन अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले. अगदी कालपरवा शिवसेनेच्या आदित्य ठाकरे आणि मनसेनेही मत चोरीचा पर्दाफाश केला. या पार्श्वभूमीवर, मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता केलेली ‘मत चोरी’ आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीच्यावतीने गुरुवारी सॅटीस पुलाखाली स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. यावेळी ठाणे शहरातील हजारो नागरिकांनी ह्या स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन मतचोरी विरोधात निषेध नोंदवुन काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेला पाठिंबा दर्शवला. अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या निर्देशानुसार, ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी कोपरी पाचपाखाडी मतदार संघाचे प्रभारी चंद्रकांतदादा पाटील, ठाणे शहर मतदार संघाचे प्रभारी श्रीरंग बर्गे, काँग्रेसचे प्रवक्ते हिंदुराव गळवे, प्रदेश प्रतिनिधी निशिकांत कोळी, उपाध्यक्ष महेंद्र म्हात्रे, सरचिटणीस दीपक ठक्कर, निलेश शेंडकर, ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील, राजू शेट्टी, बाबू यादव, शिरीष घरत, महिला अध्यक्षा स्मिता वैती, भालचंद्र महाडिक, प्रसाद पाटील, मीना कांबळे, अजिंक्य भोईर, अन्सारी, सुधाकर जाधव, श्रीकांत माने, संगिता कोटल आणि अंजली मयेकर आदिंसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

