संवादानेच बदल शक्य” — दीपक धोंडे यांचा संदेश


आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनकडून ठाणे महानगरपालिका संचलित बेघर निवारा केंद्रात सामाजिक सायकल राईड

ठाणे : ठाणे महानगरपालिका संचलित बेघर निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सायकल प्रेमी फाउंडेशनच्यावतीने सामाजिक सायकल राईडचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. बेडेकर विद्या मंदिर चे माजी शिक्षक दीपक धोंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

धोंडे यांनी आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करत, “अशा भेटीमुळे केवळ बेघर नागरिकांनाच नव्हे तर समाजालाही स्वतःकडे आरशात पाहण्याची संधी मिळते,” असे मत व्यक्त केले. त्यांनी निवारा केंद्रातील रहिवाशांशी आणि आम्ही Cycle प्रेमी सदस्यांशी मनमोकळा संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, “ठाणे महानगरपालिकेने बेघरांसाठी निवारा केंद्रासारखा उपक्रम राबवणे ही एक स्तुत्य सामाजिक जबाबदारी आहे. मात्र येथे राहणारे नागरिक हे केवळ आर्थिक अडचणीमुळे नाही, तर कौटुंबिक ताणतणाव, नातेसंबंधातील दुरावा आणि समाजाकडून झालेल्या उपेक्षेमुळेही इथे पोहोचले आहेत. अनेक जण प्रॉपर्टीमध्ये हिस्स्याचे भांडण झाल्याने किंवा जबाबदारी टाळल्याने घराबाहेर पडले आहेत.” धोंडे यांनी यावेळी संवेदनशील निरीक्षण नोंदवत म्हटले, “आजच्या काळात समाजाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. प्रत्येक माणसाची वेगळी कहाणी आहे. कोणाला नोकरी नाही, कोणाला आधार नाही. पण समाजाने थोडंसे मन उघडले तर अशा लोकांसाठी उपाय नक्कीच सापडतील. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे, आणि दुर्बलांसाठी पुढे येणे — हेच खरी सामाजिक बांधिलकी आहे.”

या प्रसंगी आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनच्या सदस्यांनी निवारा केंद्रातील रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या गरजा, अडचणी आणि अनुभव जाणून घेतले. संवादातून निर्माण झालेल्या आत्मीयतेने दोन्ही बाजूंना भावनिक ऊर्जा मिळाली. यावेळी गुरुप्रसाद देसाई यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या निवारा केंद्रातील लाभार्थ्यांना खाऊचे वाटप केले. तर संस्थेच्या वतीने तेथील एक आजोबांची कॅरम ची आवड लक्षात घेऊन त्यांना कॅरम तसेच इतर जेष्ठ नागरिकांना नवीन कपडे दिले. यावेळी त्यांचे डोळे पाणवले होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञा म्हात्रे, सचिव दीपेश दळवी, यांच्यासह सायकल राईडचे नेतृत्व करणारे अमोल कुलकर्णी गणेश कोळी निखिल शिवलकर, चंद्रशेखर जगताप, प्रिया कांबळे, गायत्री रिठे, ज्ञानदेव जाधव, सुनील रोकडे, स्वप्निल निवाते या नियोजन समितीच्या सदस्यांसह इतर सायकल प्रेमी उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top