राज्यातील ६० ठिकाणी ‘ स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ‘ उभारणार! — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नागपूर :- विद्यार्थी दशे पासूनच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा ‘ संस्कार ‘ शालेय विद्यार्थ्यांच्यावर व्हावा! तसेच वाहन धारक असलेल्या त्यांच्या पालकांच्यात रस्ता सुरक्षिततेबध्दल जनजागृती व्हावी तसेच ज्येष्ठाना विरंगुळा मिळावा या तिहेरी उद्देशाने राज्यभरातील विविध शहरांमध्ये ‘ स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ‘ उभारण्याची योजना मोटार परिवहन विभागाने आखली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, देशात आणि प्रामुख्याने राज्यांमध्ये वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अत्यंत गरजेचं झाले आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ज्या शहरांमध्ये प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत, त्या शहरात ‘ स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ‘ निर्माण करून तेथे शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वाहतुकीच्या नियमांचे आकलन करून देणे, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाच्या किमान एक एकर जागेमध्ये एक कोटी रुपये खर्च करून हे ट्राफिक पार्क उभारले जाईल. या पार्कमध्ये दुर्मिळ वनस्पती, विविध आकर्षण फुल झाडे, हिरवळीचे पट्टे असे सुंदर आरेखन असलेले ‘प्रबोधन, माहिती व विरंगुळयाचे केंद्र उभारण्यात येणार आहे. याचा लाभ शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनींना त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये वाहतूक नियम प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पाळणारे जबाबदार नागरिक बनविण्यासाठी तर ज्येष्ठांना मनोरंजनाबरोबर विश्रांतीसाठी होईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विविध वाहतूक चिन्हे, प्रतिके, वेगमर्यादा पालन करण्याच्या सूचना, सुभाषितांच्या माध्यमातून या उद्यानामध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पालन करण्यासंबंधिचे प्रबोधन करणे, हा याचा मुख्य हेतू आहे . तथापि, या पार्कमध्ये विविध दुर्मिळ वनस्पती आकर्षक फुलझाडे व लँडस्केपिंग च्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र देखील निर्माण केली जाईल.
सध्या मोटार परिवहन विभागाकडे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये हे ‘ ट्राफिक पार्क ‘ उभारले जाणार आहेत. जिथे मोटार परिवहन विभागाची जागा नसेल तिथे महापालिका, नगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून अशी जागा विकसित करण्यात येणार आहे. ‘ स्वर्गीय आनंद दिघे ट्राफीक पार्क ‘ निर्मितीचा सर्व खर्च रस्ता सुरक्षा निधीच्या माध्यमातून मोटार परिवहन विभाग करणार आहे. तथापि भविष्यात त्याची देखभाल संबंधित महापालिका अथवा नगरपालिकेने करणे अपेक्षित आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top