परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले ठाणे महापालिका क्षेत्रातील पाळीव प्राण्यासाठीच्या पहिल्या शवदाहिनीचे लोकार्पण

        ठाणे :- ठाणे महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी गॅसवर आधारित पहिली शवदाहिनी सुरू झाल्यामुळे प्राणीप्रेमींची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे. डॉग शेल्टर आणि पेट गार्डन हा आपला पुढील संकल्प असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. बाळकुम अग्निशमन केंद्रामागे माजिवडा गाव येथे उभारण्यात आलेल्या पाळीव प्राण्यांसाठीच्या पहिल्या गॅसदाहिनीचे लोकार्पण शनिवारी सकाळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

       ठाणे शहरात पाळीव प्राण्यांसाठीही स्मशानभूमी असावी अशी विनंती मी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यानुसार, माजिवडा गाव स्मशानभूमीलगत पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. या स्मशानभूमीचे प्रवेशद्वार वेगळे आहे. या स्मशानभूमीमुळे प्राणीप्रेमींची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण झाली आहे, असे यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. याप्रसंगी, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, कार्यकारी अभियंता संजय कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता धायगुडे, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षमा शिरोडकर, उप बी. व्ही. अभियंता गव्हाणे, प्राणी मित्र संघटनेच्या सोनाली सजननी आदी उपस्थित होते.

      भटक्या कुत्र्यांची समस्या लक्षात घेऊन मानवी वस्तीपासून दूर, घोडबंदर रोड परिसरात एक डॉग शेल्टर उभारण्याची सूचना मी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना केली आहे. त्यासाठी आता जागेचा शोध सुरू आहे. तसेच, मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात पेट गार्डन विकसित करण्याचाही मानस असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

      ठाणे महानगरपालिका हद्दीतील ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील स्मशानभूमींचे नुतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने महापालिका क्षेत्रातील मुलभूत सोयीसुविधांचा विकास या अंतर्गत ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यात येऊर गाव, रामबाग-उपवन, माजिवडा गाव, वाघबीळ गाव  आणि मोघरपाडा येथील स्मशानभूमीच्या नुतनीकरण आणि सुशोभीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यापैकी माजिवडा गाव येथील स्मशानभूमीच्या नुतनीकरणातंर्गत पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top