दहा महिने इतका प्रदीर्घ काळ रंगायतनचं नूतनीकरण करण्यात गेला. पण नव्या रंगायतनमध्ये उद्घाटनानंतर अवघ्या वीस दिवसांत आणि नाटकाच्या दोन प्रयोगात डी28 ही खुर्ची तुटली.
प्रेक्षागृहाच्या डावीकडच्या भागातल्या दुस-या रांगेतल्या कोपऱ्यातल्या खुर्च्यांवरून नाटक पूर्ण दिसत नाही. पैसे देऊन येणा-या प्रेक्षकांवर हा अन्याय आहे. पुर्वीच्या रंगायतनमधल्या तब्बल 200 खुर्च्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखादं लोकप्रिय नाटक बघायला येणा-या रसिकांची ही सांस्कृतिक उपासमार आहे
रंगमंचावर हौशी किंवा प्रायोगिक नाटकं करणा-यांसाठी पूर्वी ठेवण्यात आलेल्या लेव्हल्स हलक्या होत्या. आता त्या उचलायला जड आहेत. त्यामुळे नवोदित रंगकर्मींची ऊर्जा नाटक करण्याआधीच निघून जाणार आहे.
पूर्वी नाटकाचा पडदा बंद करणा-याने नुसतं बटन दाबलं की पडदा हळुच सरकायचा आणि बंद व्हायचा. आता पडदा पूर्ण पडेपर्यंत बटन दाबून धरावं लागतं. त्यामुळे मानवी चुकीमुळे जर बटनावरचा हात सुटल्यास पडदा मध्येच थांबण्याची आणि फजिती होण्याची शक्यता आहे.
शिवाय, जर ऑर्केस्ट्रा असेल तर त्यांची काही साऊन्ड सिस्टीम रंगमंचाच्या दोन्ही कोप-यात ठेवण्यासाठी पुरेशी जागा ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑर्केस्ट्रा करणा-यांना समस्येला तोंड द्यावं लागणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या स्वप्नातल्या पुर्वीच्या रंगायतनच्या सोयीसुविधा जाऊन तिथे आता त्रुटीच दिसत आहेत. रंगायतन ही ठाण्याची शान आहे, पण ह्या त्रुटी म्हणजे त्या पुर्वीच्या रंगायतनला लागलेलं गालबोट आहे. मग 43 कोटी खर्च करून आणि 10 महिने रंगायतन बंद करून उपयोग काय झाला?