नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 14 गावांना नागरी सुविधा पुरवण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळेच्या कामांना तातडीने प्राधान्य द्यावे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई :- नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळा ह्या कामांना ताताडीने प्राधान्य द्या. याभागातील दप्तर हस्तांतरणाची कार्यवाही त्वरीत पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना आज येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या १४ गावांच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव गोविंदराज, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आदी उपस्थित होते.

या गावांमध्ये तातडीने मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने कार्यवाहीला वेग द्यावा. तात्पुरती आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोर्टा केबिनच्या सहाय्याने दवाखाने सुरू करण्यात यावे. नावाळी येथे असलेल्या जुन्या इमारतीमध्ये नव्याने रुग्णालय सुरू करण्यासाठी संबंधिताना निर्देश द्यावे, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वाकळण येथील तलावाचे सुशोभीकरण करून नवी मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत या गावांमधील साफसफाई करण्यात यावी. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावी तसेच या गावांमधील शासकीय दप्तर नवी मुंबईकडे हस्तांतरीत करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

या गावांचा नियोजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून रस्ते, पायाभूत सुविधा, जमिनीचा उपयोग आदी घटकांचे सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे आयुक्त श्री. शिंदे यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या १४ गावांसाठी १९ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये प्राधान्याने शाळा, आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, पायवाटा, रस्ते या सुविधाचा समावेश असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top