..
अविष्कार साळवी यांचा खेळाडूंना सल्ला : “क्रिकेटला संघभावनेने पाहिलं तरच यश मिळतं”..
ठाण्यातील प्रतिष्ठेची एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा यंदा ४९ व्या वर्षात पदार्पण करत दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दिमाखात सुरू झाली. उद्घाटनप्रसंगी भारतीय महिला संघाचे गोलंदाज प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू अविष्कार साळवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना साळवी म्हणाले, “प्रत्येक खेळाडूने क्रिकेटकडे संघभावनेने पाहिलं पाहिजे; एकदिलाने खेळलात तरच या खेळात यशाची द्वारं उघडतात.”
उद्घाटन सोहळ्यास स्पर्धेचे अध्यक्ष, ठाण्याचे आमदार संजय केळकर उपस्थित होते. भारतीय महिला संघाने अलीकडेच विश्व विजेतेपद पटकावल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय योगदानाबद्दल अविष्कार साळवी यांचा स्टार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आमदार केळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
स्पोर्टिंग क्लबच्या नव्या कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास स्पोर्टिंग क्लब कमिटी सदस्य व प्रशिक्षक किरण साळगावकर, आमदार संजय केळकर यांचे ज्येष्ठ बंधू सदानंद केळकर, ज्ञानसाधना विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सुयश प्रधान, सेक्रेटरी बाळा खोपकर, अंपायर बोर्डाचे आशिष कर्णिक, मंगेश कदम, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त (क्रीडा) सौ. मीनल पालांडे, ॲड. अल्केश कदम, तुकाराम सुर्वे स्पोर्ट्स क्लबचे अतुल सुर्वे, कौस्तुभ केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ क्रीडा समीक्षक प्रल्हाद नाखवा यांनी उत्तमरीत्या पार पाडले.

