सचिन अहिर यांच्या उपस्थितीत पुणे येथून टेम्पो भरून औषधे रवाना
ठाणे :– मराठवाड्यात निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीमुळे शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. अनेकांचे संसार रस्त्यावर आले असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटकाळात मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुढे सरसावला असून, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील स्थानिक शिवसैनिकांसह अहोरात्र मदतकार्यात सक्रिय झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर, पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मोठा पुढाकार घेतला आहे. आनंद दिघे युवा प्रतिष्ठान व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मोफत औषध पुरवठा करण्यात येणार आहे.
यासाठी औषधांनी भरलेला एक मोठा टेम्पो पुणे येथून पूरग्रस्त भागाकडे रवाना झाला आहे. यावेळी पक्षाचे उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. सचिनजी अहिर, पुणे जिल्हा प्रमुख श्री. उल्हासजी शेवाळे, राज्य संघटक श्री. वसंतजी मोरे, शहर प्रमुख संजयजी मोरे, युवासेना जिल्हाप्रमुख सागर मोडक, सुजित थेवरे, नितीन गावडे, प्रतिष्ठानचे श्री अभिषेक जाधव, रोहन आंब्रे, संजय पाठक तसेच अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा टेम्पो रवाना झाला. याविषयी बोलताना केदार दिघे म्हणाले, “पुराच्या पाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या बांधवांपर्यंत आरोग्यविषयक मदत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या संस्कार आणि शिकवणीनुसार आम्ही हे मदतकार्य करत आहोत.”
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे स्थानिक पातळीवर नागरिकांना धीर देत असून, मदतकार्यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे असे केदार दिघे म्हणाले.