मनोरुग्णालयातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ठाण्यात येणार

ठाणे :- नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला कडाडून विरोध दर्शविल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयामधील वृक्षतोडीच्या फतव्या विरोधात दंड थोपटले आहेत. शुक्रवारी (ता. १२ डिसेंबर२०२५) मनसे ठाणे – पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनोरुग्णालयात पाहणी करून एकही वृक्ष तोडू देणार नसल्याचा इशारा दिला.तसेच, येत्या काही दिवसात मनोरुग्णालयातील वृक्ष वाचवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ठाण्यात येणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
नाशिकच्या तपोवनानंतर ठाण्याच्या प्रादेशिक मनोरूग्णालयातील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाण्यातील ब्रिटिशकालीन प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात ३ हजार ३०० बेडचे बंगलोरच्या धर्तीवर नविन मनोरुग्णालय उभारण्यात येत आहे. या बांधकामाच्या आड येणाऱ्या १६१४ झाडांपैकी ७०० हून अधिक झाडे बाधित होणार आहेत. वृक्षतोडीच्या वृत्तानंतर ठाणेकरांमध्ये संताप व्यक्त होत असल्याने शुक्रवारी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनोरुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. प्रशासन आणि बिल्डरांकडुन जागा लाटण्याकरिता हे षडयंत्र रचले जात आहे. असा आरोप करून मनसे नेते अविनाश जाधव यांनी याठिकाणी सेंट्रल पार्क तयार करावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः देखील ठाणे मनोरुग्णालयात भेट देऊन वृक्षांची पाहणी करणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. मनोरुग्णालयातील एकही झाड तोडून देणार नाही. असा इशारा मनसेने दिला असुन या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी आणि ठाणेकरांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

Box – मनोरूग्णांच्या जीवासह आर्थिक स्थितीशी प्रशासनाचा खेळ

मनसे नेते अविनाश जाधव यांनी, मनोरुग्णालयात भेट दिली असता काही रुग्णांच्या नातेवाईकांनी कैफियत मांडली. त्यात प्रशासनाकडून सुरू असलेल्या औषध घोटाळ्याची माहिती मिळताच जाधव यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मनोरुग्णालयातील डॉक्टर अशी औषधे लिहून देतात जी रुग्णालयात उपलब्ध नसतात. मात्र हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या मेडिकलमध्ये उपलब्ध असतात. डॉक्टर म्हणतात, पर्यायी औषधे आमच्याकडे आहेत. मग जर पर्यायी औषधे उपलब्ध असताना दीड ते दोन हजार रुपयांची औषधे बाहेरून का विकत घ्यायला लावतात, यामागे कोणते रॅकेट आहे. येथील डॉक्टर्स आणि काही मेडिकल कंपन्यामध्ये संगनमत आहे का? असा सवाल करून अविनाश जाधव यांनी,हा केवळ रुग्णांच्या जीवाशीच नव्हे तर त्यांच्या आर्थिक परिस्थितीशी खेळ मांडला आहे.तेव्हा, गोरगरिबांची फसवणुक करणाऱ्या डॉक्टरांना तात्काळ निलंबित न केल्यास मनसे हिसका दाखवणार असल्याचा गर्भित इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.
याप्रसंगी रविंद्र मोरे (ठाणे शहर अध्यक्ष ) मनोहर चव्हाण,पुष्कर विचारे.संदिप साळुंखे,पवन पडवळ.अनिल माने,आदी उपस्तिथ होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top