प्रारंभ कला अकॅडमीतर्फे आयलीफ बँक्वेट हॉलमध्ये ०८ नोव्हेंबरला भव्य आयोजन
ठाणे,दि.३१ प्रतिनिधी
सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली २३ वर्ष कार्यरत असलेल्या ठाण्यातील प्रारंभ कला अकॅडमी या सामाजिक संस्थेच्या “आम्ही साऱ्याजणी” महिला महोत्सवात यंदा राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय भारूडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार आहे. ह्या महोत्सवाचे हे १३ वे वर्ष आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील आयलीफ बँक्वेट हॉलमध्ये ०८ नोव्हें. रोजी दुपारी ३:३० ते रात्रौ ८:३० या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या चार दांपत्यांसह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार केला जाणार आहे. तरी विनामुल्य प्रवेश असलेल्या या महोत्सवात ठाणेकरांनी सहभागी व्हावे. असे आवाहन प्रारंभच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी पत्रकार परिषदेत केले.
प्रारंभच्या महिला महोत्सवाच्या निमित्ताने ०५ नोव्हे.ला डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धासह १८ ते ३५ वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील महिलांसाठी गीत गायन, समुह नृत्य आणि एकल नृत्य स्पर्धां होणार आहेत. या स्पर्धामधील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ ०८ नोव्हे. रोजी आर मॉलमधील आयलीफ सभागृहात होणार असुन सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ समाजसेविका रेणु गावसकर प्रमुख पाहुण्या असतील. याप्रसंगी पितांबरी प्रॉडक्टसचे व्यवस्थापकिय संचालक रविंद्र प्रभुदेसाई, सुधाताई म्हैसकर, नानजी पटेल, चित्रपट निर्मात्या अपर्णा पाडगावकर, प्रतिष आंबेकर, पोलीस महानिरिक्षक संजय दराडे, डॉ.सचिन पैठणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात भारूडकार चंदाताई तिवाडी यांची लोककला सादर होणार असुन आयपीएस समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर या दांपत्याची मुलाखत डॉ. अरुंधती भालेराव घेणार आहेत.

