महापालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचे काम वेगाने करावे – आयुक्त सौरभ राव

आयुक्‌तांनी घेतला कामकाजाचा आढावा

ठाणे : ठाणे शहराचे नागरिकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेवून नागरिकांना पुरेशा सेवासुविधा देता याव्यात यासाठी महापालिकेचे नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरची प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये प्राथमिक कामे वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

        या बैठकीस अतिरिक्त आयुक्‌त (1)  संदीप माळवी,  अतिरिक्त आयुक्‌त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, शुभांगी केसवाणी, कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, आसावरी सोरटे यांच्यासह संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.

        ठाणे महानगरपालिकेचे अस्तित्वातील प्रशासकीय भवन हे चार मजली असून वाढत्या कामाची व्याप्ती लक्षात घेता जागा अपुरी पडत आहे. आगामी काळातील जागेची उपलब्धतता लक्षात घेवून रेमंड कंपनीच्या जागेत 32 मजली इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. या संदर्भात आयुक्तांनी सर्व संबंधित ‍विभागाचा आढावा घेतला. या जागेतील बहुतांशी झाडे बाधित होत असून ती नष्ट न करता त्यांचे नवीन जागेत पुनर्रोपण करण्याचे काम सुरू असल्याची माहिती या बैठकीत संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी दिली.   

        महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीत असलेल्या कार्यालयांची जागा व आगामी काळात आवश्यक असलेली जागा विचारात घेवून त्यानुसार नियोजन करण्यात यावे. तसेच या विभागांमध्ये अधिकारी कर्मचारी यांची बैठक व्यवस्था योग्य प्रकारे होण्यासाठी जागेचे ‍ नियोजन करण्यात यावे. तसेच मा. महासभेचे सभागृह स्वतंत्ररित्या बांधण्यात येणार असून आगामी 50 वर्षातील नगरसेवकांची संख्या लक्षात घेवून बैठक व्यवस्था करावी अशाही सूचना यावेळी दिल्या. तसेच इमारतीमधील सर्व मजल्यांवरील कार्यालयांमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश व खेळती हवा राहिल याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे अशी चर्चा यावेळी करण्यात आली. सद्यस्थितीमध्ये शहर विकास विभागामार्फत नकाशे व आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली असून मृदुपरीक्षणाचे काम सुरू आहे तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्याकडून आवश्यक त्या मान्यता प्राप्त झाल्या आहेत. अंदाजे सन 2027 मध्ये पूर्ण होणाऱ्या या इमारतीचे बांधकाम विहित मुदतीत या दृष्टीने नियोजन करुन काम करावे असे निर्देशही यावेळी आयुक्तांनी दिले. सदर इमारतीचे आराखडे प्रसिद्ध वास्तुविशारद  हफिझ कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत तयार करण्यात आले आहेत.

        नवीन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना व महापालिकेच्या आस्थापनेवर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सुसज्ज व अद्ययावत असे भवन उपलब्ध होणार असल्याचे आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top