मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
महाराष्ट्र शासन,
मुंबई.
विषय : ठाण्यातील कृत्रिम तलाव व कंटेनरमधील साचलेल्या पाण्यामुळे वाढणारा डेंग्यू-मलेरियाचा धोका…
मा. मुख्यमंत्री साहेब,
आम्ही ठाणेकर गेल्या काही दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली जगत आहोत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव अगोदरच फोल ठरला असताना, उत्सवाच्या नावाखाली ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून कृत्रिम तलाव आणि लोखंडी कंटेनर उभारले. या निर्णयामागे उद्देश चांगला असला, तरी प्रत्यक्षात हा प्रयोग आमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरला आहे.
गणेशोत्सव विसर्जन संपल्यानंतर या तलावांत व कंटेनरमध्ये पाणी साचून राहिले . काही ठिकाणी ते सडू लागले असून त्यातून डासांची पैदास वाढण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. आधीच ठाण्यात डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण शेकड्यांनी वाढलेले असताना, या दूषित पाण्यामुळे परिस्थिती आणखी भयावह होईल, अशी भीती आमच्या मनात आहे.
साहेब, आम्ही नागरिक कररुपी पैशातून या सुविधा उभ्या राहिल्या पाहतो, पण त्या आमच्या जिवाला घातक ठरतील हे आम्ही कधीच स्वप्नातही विचारले नव्हते. आज आमची मुलं, आमचे वृद्ध पालक, आणि सर्वसामान्य ठाणेकर डासांच्या चाव्यामुळे भीतीत आहेत. हा फक्त आरोग्याचा प्रश्न नाही, तर तो आमच्या कुटुंबाच्या अस्तित्वाशी, सुरक्षिततेशी जोडलेला प्रश्न आहे.
महापालिकेकडून वेळेत तळी रिकामी करून निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया न झाल्याने आज ठाणेकरांना साथरोगाचा धोका टांगती तलवार बनून डोक्यावर लटकत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने आता आमचा विश्वास फक्त आपल्या हस्तक्षेपावर आहे.
म्हणून आपणास आमच्या काही नम्र मागण्या :
- विसर्जनासाठी उभारलेले सर्व कृत्रिम तलाव व कंटेनर तात्काळ रिकामे करून सुरक्षित विल्हेवाट लावावेत.
- संबंधित ठिकाणी तातडीने फॉगिंग व निर्जंतुकीकरण मोहिमा राबवाव्यात.
- डेंग्यू-मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून विशेष पथके ठाण्यात तैनात करावीत.
- भविष्यातील ‘पर्यावरणपूरक’ उपक्रम प्रत्यक्षात वैज्ञानिक व सुरक्षित पद्धतीने राबवावेत.
साहेब, आम्हाला माहित आहे की आपण नेहमीच लोकांच्या प्रश्नांशी संवेदनशील राहिला आहात. म्हणूनच आज ठाणेकर आपल्या दारी हाक देत आहेत. कृपया आमच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी त्वरित कारवाई व्हावी, हीच आमची प्रामाणिक विनंती आहे.
आपला विश्वासू,
प्रशांत रेखा रविंद्र सिनकर
पर्यावरण अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार