जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमात ५० टक्के समस्या मार्गी..मुसळधार पावसातही नागरिकांची उपस्थिती

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपले असताना आज भर पावसात जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात सुमारे १५० नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले. आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक प्रकरणे मार्गी लागल्याने ठाण्यासह आजुबाजूच्या शहरातील नागरिकही विश्वासाने या उपक्रमात सहभागी होत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम पार पडला. यावेळी मुसळधार पाऊस असूनही सुमारे १५० नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले. यात वारसा हक्काचे प्रश्न, पुनर्विकास योजनेतील फसवणूक, महापालिकेतील विविध विभागांमधील कामगारांच्या प्रश्नांचा समावेश होता. यातील काही प्रश्न श्री.केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून जागीच सोडवले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

यावेळी ठाणे शहरातील पाच विभागातून पाणी टंचाईच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित राहिले होते. श्री.केळकर यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. हे अधिकारी त्या-त्या विभागात बुधवारी भेट देणार असून प्रत्यक्ष तपासणी करतील आणि त्यावर उपाययोजना करतील, अशी माहिती श्री.केळकर यांनी दिली. यावेळी आमदार ॲड.निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, विकास पाटील हे देखील उपस्थित होते.

कै.रामभाऊ म्हाळगी यांच्या काळापासून सुरू असलेल्या जनसंवादाचा उपक्रम आम्ही आजतागायत सुरू ठेवला आहे. लोकसहभाग, लोकचळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आम्ही काम करत आहोत. काही प्रश्न जागीच सोडवण्यात येत असून काही प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असल्याचे श्री.केळकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top