मोहम्मद पैगंबर यांच्या संदेशांचे फलक
मानवता आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना
ठाणे – इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला. या संदेशांचा मानवी जीवनात अवलंब व्हावा, या सद्हेतूने ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात या मानवी साखळीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते.
मोहम्मद पैगंबर यांनी मानवी मूल्ये, शांतता आणि मानवतेचा संदेश दिला होता. मात्र, सध्या जगात अशांतता निर्माण झाली आहे. जगात जे सुरू आहे; ते थांबावे आणि लहान मुलांमध्ये मानवतेची शिकवण रुजावी, या सद्हेतूने अश्रफ शानू पठाण आणि मर्जिया शानू पठाण यांनी या मानवी साखळीचे आयोजन केले होते.
वृद्धांचा आदर करणे म्हणजे अल्लाहचा आदर करण्यासारखे आहे, तुमच्यापैकी सर्वात उदार तो आहे जो त्याने शिकलेल्या गोष्टी लोकांमध्ये पसरवतो, अल्लाहच्या नजरेत महिला पुरूषांपेक्षा जास्त प्रिय आहेत आणि जो पुरुष आपल्या महरम महिलांना आनंद देईल त्याला अल्लाह खूप बक्षीस देईल, खोटे बोलणे तुमच्या उपजीविकेवर नकारात्मक परिणाम करेल, आदी संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो अबाल वृद्ध, महिला, तरूण दारूल फलाह मशिदीसमोरील मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते.
या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी, प्रेषिताने सांगितलेल्या मार्गावर चालणे हेच पुण्यकर्म आहे. सध्या माजलेली अराजकता कमी करण्यासाठी आपणाला प्रेषितांची शिकवण आत्मसात करावी लागेल. त्याचसाठी ही मानवी साखळी करण्यात आली होती, असे सांगितले.