बिल्लावर समाजाचा २५ वा रोप्य महोत्सवी समारंभ ठाण्यात संपन्न

समाज एकत्र राहिला तरच समाजाची प्रगती होते

“कर्नाटकाची मुळे, महाराष्ट्राचे हृदय – बिल्लावर समाजावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्तुती वर्षाव!”

ठाणे, : समाज एक संघ राहिल्यास समाजाची प्रगती आणि उन्नती होते. ज्या ठिकाणी तुम्ही जाता, त्या ठिकाणच्या माती, संस्कृती आणि परंपरेशी तुम्ही एकरूप होत समाजाला पुढे नेत आहात. तशीच आमची शिवसेना आहे, जी सर्व समाजांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे पुढे नेण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बिल्लावर असोसिएशन मुंबईतर्फे आयोजित २५ वा रौप्य महोत्सवी समारंभ ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “ब्रह्मर्षी नारायण गुरुजींनी दिलेला ‘एक धर्म, एक जात आणि एकच देव’ हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. ‘शिक्षणाद्वारे स्वावलंबी बना’ हा त्यांचा संदेश समाज उन्नतीची खरी दिशा दाखवणारा आहे.”

मुंबई, ठाणे आणि राज्यभरात बिल्लावर समाजाच्या २२ स्थानिक शाखा कार्यरत असून ३८ हजार सभासद उत्सव, परंपरा आणि संस्कृती जपत एकोप्याने राहतात, हे कौतुकास्पद असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कोविड काळातील समाजाने केलेल्या सामाजिक कार्याची आठवण करून देत त्यांनी म्हटले, “त्या काळात मोठ्या संख्येने तुमच्या समाजाने मदतकार्य करत गरजूंपर्यंत अन्न पोहोचवले. संकटाच्या वेळी समाज एकत्र येऊन सेवा करतो, हे तुमच्या संस्कारांचे उदाहरण आहे.”

कार्यक्रमात सादर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाट्यप्रयोगाचेही शिंदे यांनी कौतुक केले. कलाकारांनी तीन महिने मेहनत घेऊन ऐतिहासिक भूमिकांना न्याय दिल्याचे त्यांनी गौरविले.

शिवसेनेच्या भूमिका सांगताना शिंदे म्हणाले, “आमच्या पक्षात कोणी मालक किंवा नोकर नाही, सगळे कार्यकर्ते आहोत. मुख्यमंत्री असतानाही आणि आता उपमुख्यमंत्री असूनही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आणि पुढेही तसाच राहीन.”

शिक्षण क्षेत्रात समाज करत असलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांनी तरुण पिढीसाठी संदेश दिला.
“उच्च शिक्षण, मेहनत आणि प्रामाणिकपणामुळे तुमच्या समाजातील मुले उद्या अधिकारी, अभियंते, डॉक्टर, वकील आणि मोठ्या पदांवर पोहोचतील, यात शंका नाही,” असे त्यांनी नमूद केले.

शेवटी समाजाला आश्वस्त करत शिंदे म्हणाले,
“जिथे जिथे तुम्हाला मदत लागेल, तिथे शिवसेना आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

यावेळी शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटिका आणि माजी महापौर सौ. मीनाक्षी शिंदे आणि बिल्लावार समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top