भविष्य घडविणाऱ्या योजनांवर राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची घोषणा 

मुंबई :- देशवासीयांचे भविष्य घडविणाऱ्या कल्याणकारी योजना, अभियान, उपक्रमावर आधारित राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा भरविण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आज केली. या स्पर्धेत नव्या प्रतिभेच्या कलाकारांबरोबरच नामांकित कलाकारांनी भाग घ्यावा, असे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी केले.

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे झालेल्या बैठकीस  दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, उपस्थित होते.  

सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची ‘टर्न व्हिजन इनटू आर्ट : डिझाइन द पोस्टर, सेलिब्रेट द डिकेड’ अशी थीम ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली आहे. 

मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्किल इंडिया, वेव्ह्ज समिट, वातावरण बदल, योगा आदी विषय या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत. 

स्पर्धकांना ए२ आकारातील पोस्टर पीडीएफ, जेपीईजी, पीएनजी (हाय-रेझोल्यूशन) मध्ये www.pmvision2art.com या संकेतस्थळावर ७ ऑक्टोबरपर्यंत अपलोड करायचे आहेत. 

७५ विजेत्यांना पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच त्यांची कलाकृती प्रमुख कला दालनांमध्ये प्रदर्शित केली जाईल. त्याचबरोबर विजेत्यांची कलाकृती एका विशेष कॉफी-टेबल बुकमध्ये समाविष्ट करण्यात येईल. या स्पर्धेसाठी अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडियाचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top