अंधारातून प्रकाशाकडे… ठाणे जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल १३,५०० रुग्णांना मिळाली नवदृष्टी!
- मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेत ठाण्याचा राज्यात अव्वल डंका”
ठाणे : प्रतिनिधी
मोतीबिंदू हा आजार हजारो ज्येष्ठ, गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्तेत लोटत असला, तरी, शासनाच्या ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात हजारो रुग्णांच्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश फुलला आहे. जिल्ह्यासाठी ७१८२ शस्त्रक्रियांचं लक्ष्य होतं; मात्र त्याहून दुप्पट म्हणजे तब्बल १३,३५१ मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडत ठाणे जिल्ह्याने राज्यात इतिहास घडवला आहे. पुण्यानंतर ठाणे अव्वल ठरलं आहे.
२२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या एक महिन्याच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेत ठाणे सिव्हिल रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, खाजगी रुग्णालये, एनजीओ , ठाणे ऑप्थाल्मिक असोसिएशन, सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि माध्यमांनी खांद्याला खांदा लावून काम केलं. सततची जनजागृती, मोफत तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे हजारो रुग्णांनी धैर्याने पुढे येत उपचार करून घेतले.
सदर विशेष मोहिमेत राज्यात १ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पाडण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने निर्धारित केले होते आणि सदरचे उद्दिष्ट सफल देखील झाले. एकट्या ठाणे जिल्ह्याने ह्यामध्ये १३३५१ शस्त्रक्रिया करून उद्दिष्टपूर्तीचा मोठा वाटा उचलला आहे
“मोतीबिंदूची लक्षणं दिसताच तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. सुदैवाने ठाण्यात ही मोहीम नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे. डॉक्टर, परिचारिका आणि नेत्रतज्ज्ञांचे पथक सतत काम करत असल्याने रुग्णांमध्ये समाधानाची भावना असल्याची माहिती जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी दिली.
*
मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ ही केवळ वैद्यकीय मोहीम नाही, तर नवदृष्टी देणारा सामाजिक प्रयत्न आहे. रुग्णांच्या जीवनात पुन्हा प्रकाश पेरणं हेच यशाचं खरं फलित आहे,” या मोहिमेमुळे ठाणे जिल्हा म्हणजे “नवदृष्टीचा जिल्हा” म्हणून ओळख मिळवत आहे
डॉ. कैलास पवार ( जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे)