आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे — हजारो आदिवासींच्या निर्धाराने ठाणे शहर फुलून गेले

सरकारकडून केवळ आश्वासन नको — 26 जानेवारी 2026 पर्यंत कातकरींना त्यांचे मूलभूत अधिकार न मिळाल्यास, श्रमजीवी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हक्क हिसकावून घेणार!

सरकारच्या 2047 च्या व्हिजन मध्ये आदिवासी कातकरीचे अस्तित्व उपेक्षित – विवेक पंडित

मालकांनी तुम्हांला दिलेले आगाऊ पैसे कायद्याप्रमाणे आजपासून फिटले – विवेक पंडित

ठाणे, :- श्रमजीवीच्या हजारो आदिवासी स्त्री-पुरुषांच्या, तरुण- तरुणीच्या सहभागामुळे ठाणे शहर आज निर्धाराच्या प्रकाशाने उजळून गेले. आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी 5 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर सुरु असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या “आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे” या आंदोलनाचा दुसरा दिवस ठाण्यात अत्यंत उत्साहात आणि आदिवासी बचाव, कातकरी बचाव आत्मनिर्धाराने सुरु झाला. यावेळी प्राध्यापक सदानंद वर्दे, माजी शिक्षण मंत्री आणि समर्थन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष यांना जन्मशताब्दी निमित्त आदरांजली वाहिन्यात आली.

दरम्यान आत्मनिर्धार करण्यासाठी आज पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून हजारो श्रमजीवी निर्धार मोर्चा घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारीत, जेवणासाठी फाट्या लाकूड घेऊन रॅली काढून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रमजीवीच्या निर्धार आंदोलनाला भेट दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रमजीवी संघटनेच्या सभासदांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत, “गेल्या ४० वर्षांपासूनच्या मूलभूत मागण्या न्याय्य असून त्या सरकारच्या लक्षात आहेत. त्यावर चर्चा करून तातडीने तोडगा काढू असे आश्वासन दिले. आदिवासी कातकरी समाजाच्या अस्तित्वासाठी परिवर्तनासाठी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना आत्मक्लेश करावा लागतो, याचे सरकारला दुःख व पश्चाताप आहे,” असे सांगितले. यावर सकारात्मक भूमिका घेत आदिवासी बांधवांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मंगळवारी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली आहे.

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आत्मक्लेशातून आत्मनिर्धार आंदोलन स्थळी भेट देत श्रमजीवी च्या सभासदांशी संवाद साधत प्रलंबित मागण्या आणि आदिवासी जमातीच्या अस्तित्वासाठी तुमच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.

कातकरींना घरकुल न दिल्यास हक्क श्रमजीवी संघटनेने सरकार आणि प्रशासनास स्पष्ट इशारा दिला आहे की, “सरकार काही करील” या भ्रमात राहायचं नाही. 1976 मध्ये अस्तित्वात आलेल्या कायद्याची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे 26 जानेवारी 2026 पर्यंत सर्व गावठाणातील कातकरी बांधवांना घरकुल मिळाले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हक्क स्वतःच्या हाताने हिसकावून घेऊ, असा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

“कायद्याची अमलबजावणी न करण्याचा निर्णय सरकार आणि प्रशासनाने घेतल्यासारखा दिसतो. प्रशासनाचे कामगार विभाग आणि महिला व बालविकास विभाग आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून, ते निरर्थ ठरल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.

ज्या मालकांनी मजुरांना आगाऊ रक्कम दिली आहे, त्या मजुरांना आता कामावर जाण्याचं बंधन नाही. गुलामीत राहण्याऐवजी स्वाभिमानाने जगण्याचा निर्धार कातकरी बांधवांनी केला आहे. मालकांनी आदिवासी कातकरीना दिलेले आगाऊ पैसे आजपासून फिटले असे संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी श्रमजीवीच्या सभासदांना जाहीरपणे सांगितले.

दरम्यान, संघटनेचे संस्थापक विवेक पंडित म्हणाले
“2047 चं व्हिजन सांगणारं सरकार, तेव्हा कातकरी अस्तित्वात तरी राहतील का?”
जर आजच्या घडीला त्यांचा जमिनीचा, घरकुलाचा आणि जगण्याचा हक्क सुरक्षित केला नाही, तर 2047 पर्यंत हा समाज नकाशावरूनच पुसला जाईल, अशी खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाला आलेल्या श्रमजीवीच्या हजारो सभासदांनी चुली पेटवून एकत्र जेवण केले. त्यानंतर पारंपरिक गौरी, तारपा, डबा नाच नाचुन आनंद साजरा केला. त्यानंतर आत्मनिर्धाराचा नवा निर्धार घेऊन सभासद परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top