आनंदनगरमध्ये नागरीवस्तीत बेकायदेशीरपणे लॉजिंगचा घाट..रहिवाशांसह भाजपा उतरणार रस्त्यावर

..

घोडबंदर येथील आनंदनगर भागात एका गृहसंकुलालगत असलेल्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमिट रूम, लॉजिंग उभारण्याचा घाट असून येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी श्री.केळकर यांनी परिमंडळ उपायुक्तांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. कारवाईला दिरंगाई केल्यास रहिवाशांसह भाजपा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आनंदनगर परिसरातील विजय वाटिका गृहसंकुलातील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. एका बाजूला निवासी संकुल, मंदिर आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेचे सभागृह असताना येथील मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमिट रूम, लॉजिंगसाठी बांधकाम सुरू केले आहे. यामुळे भविष्यात परिसरात असुरक्षित वातावरण निर्माण होऊन रहिवाशांना येथे राहणेही कठीण होणार आहे. या बांधकामांवर तत्काळ कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. श्री.केळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे महापालिकेच्या संबंधित परिमंडळ उपायुक्तांशी चर्चा केली आणि तातडीने कारवाई करण्याची सूचना केली. कारवाई करण्यात दिरंगाई झाल्यास रहिवाशांसह भाजप देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला.

याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, एकीकडे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अनधिकृत इमारतींच्या सोयी सुविधा खंडित केल्या जात असल्या तरी दुसरीकडे अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. नागरिक लाखो रुपये देऊन घरे विकत घेतात, त्यांनी बाजूला लॉजिंग, परमिट रूम पहायचे का? असा संतप्त सवालही श्री.केळकर यांनी उपस्थित केला आहे.

या कार्यक्रमात भिवंडी पूर्णा येथून रहिवासी आले होते. बिल्डरने केलेल्या फसवणुकीमुळे अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असल्याने १०४ कुटुंबे वाऱ्यावर येणार आहेत. या कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी राहू, असेही श्री.केळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी बाळकूम येथील घर बळजबरीने तोडणे, ब्रह्माळा तलाव समस्या, गृहसंकुलांना बाकडे आणि डस्टबीन, महावितरण, ठामपा विद्युत विभाग आदी विविध विषयासंदर्भात निवेदने प्राप्त झाली. यावेळी माजी उपमाहापौर सुभाष काळे, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, सचिन पाटील, महेश कदम, ओमकार चव्हाण आदी उपस्थित होते.

आतापर्यंत ३५० सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ

मंत्रिमंडळ स्तरावर, अधिवेशनात आणि विभागनिहाय पाठपुरावा केल्यानंतर ठाणे महापालिकेसह राज्यभरात सर्व सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ३५० सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळाला असून पुढील महिन्यात उर्वरित ८० कामगारांना देखील याचा लाभ होईल. त्यामुळे नवीन प्रकरणे वगळता एकही प्रकरण शिल्लक राहणार नसून हा मी केलेल्या पाठपुराव्याचा विजय असल्याचे आमदार संजय केळकर म्हणाले. ठाणे महापालिकेत काज विभागात अद्याप किमान वेतनाचा प्रश्न भेडसावत असून याबाबत लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू, असेही श्री.केळकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top