गृहसंकुलाला सहा महिन्यांत टँकरपोटी दीड कोटींचा भुर्दंड.

.

  • पाणीटंचाईमुळे टँकरलॉबी सुसाट
  • सक्षम पाणी व्यवस्थेशिवाय नवीन इमारतींना परवानगी नको – आ. संजय केळकर

घोडबंदरमधील एका गृहसंकुलाने सहा महिन्यांत लाखो रुपये पाणी बिल अदा करतानाच त्यांना पाणीटंचाईमुळे टँकरपोटी तब्बल दीड कोटी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली. पाणी टंचाईमुळे येथील टँकरलॉबी उन्मत्त झाली असून जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन इमारतींना परवानगी देऊ नका, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पुन्हा एकदा केली आहे.

भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांच्या रहिवासी प्रतिनिधींनी भेट घेत पाणीटंचाईबाबत तक्रार केली. या तक्रारीनुसार महावीर कल्पवृक्ष ऑर्किड सोसायटीने सहा महिन्यांत ठाणे महापालिकेचे लाखो रुपयांची पाणीपट्टी अदा केली. तसेच पाणी अपुरे मिळत असल्याने या सोसायटीने या काळात दीड कोटी रुपये देखील खासगी पाण्याच्या टँकरपोटी अदा केल्याची बाब उघडकीस आली. दुसऱ्या गृहसंकुलाने १७ लाखांची पाणीपट्टी अदा केलीच, शिवाय टँकरपोटी १३ लाखही अदा केल्याची माहिती या कार्यक्रमात मिळाली.

श्री. केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी ताबडतोब फोनवरून चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. याबाबत बोलताना श्री.केळकर म्हणाले, नागरिक कर्ज घेऊन कोट्यवधी रुपयांची घरे घेतात, पण पुरेशा पाण्याअभावी त्यांना टँकरपोटी कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर या आधीही जोपर्यंत सक्षम पाणी व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत नवीन गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली होती, मात्र महापालिका पुरेसे पाणी देण्यात अपयशी ठरत असताना आजही उंचच उंच इमारतींना परवानग्या दिल्या जात आहेत. त्यामुळे टँकर लॉबीला पोसण्याचे काम होत असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला आहे. शीळमध्ये नऊ मोठी गृहसंकुले असून येथे दिवसातून एक तास देखील पाणी मिळत नसल्याबाबत श्री. केळकर यांनी संताप व्यक्त केला.

आपला दवाखानामधील कर्मचाऱ्यांनी देखील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात हजेरी लावली. आपला दवाखाना बंद झाला असून यावर टीकेची झोड उठवल्यानंतर कर्मचाऱ्यांना रखडलेले पगार देण्याचा निर्णय झाला, परंतु अद्याप त्यांना पगार मिळाले नसल्याने श्री.केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून दोन दिवसांत वेतन अदा करण्याच्या सूचना केल्या. या कर्मचाऱ्यांना आपला दवाखाना यंत्रणेचा अनुभव असल्याने त्यांना आरोग्य मंदिरे या योजनेत संधी मिळावी यासाठी प्रशासनाशी बोलणे झाल्याचेही श्री.केळकर यांनी सांगितले. कार्यक्रमात परिवहन सेवेतील कंत्राटी कामगारांचे वेतन, बिल्डरांकडून फसवणूक, सफाई कामगारांचे प्रश्न याबाबत निवेदने प्राप्त झाली.

यावेळी माजी उपमहापौर अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजपचे शहर उपाध्यक्ष महेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top