“
आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनकडून ठाणे महानगरपालिका संचलित बेघर निवारा केंद्रात सामाजिक सायकल राईड
ठाणे : ठाणे महानगरपालिका संचलित बेघर निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सायकल प्रेमी फाउंडेशनच्यावतीने सामाजिक सायकल राईडचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. बेडेकर विद्या मंदिर चे माजी शिक्षक दीपक धोंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
धोंडे यांनी आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करत, “अशा भेटीमुळे केवळ बेघर नागरिकांनाच नव्हे तर समाजालाही स्वतःकडे आरशात पाहण्याची संधी मिळते,” असे मत व्यक्त केले. त्यांनी निवारा केंद्रातील रहिवाशांशी आणि आम्ही Cycle प्रेमी सदस्यांशी मनमोकळा संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, “ठाणे महानगरपालिकेने बेघरांसाठी निवारा केंद्रासारखा उपक्रम राबवणे ही एक स्तुत्य सामाजिक जबाबदारी आहे. मात्र येथे राहणारे नागरिक हे केवळ आर्थिक अडचणीमुळे नाही, तर कौटुंबिक ताणतणाव, नातेसंबंधातील दुरावा आणि समाजाकडून झालेल्या उपेक्षेमुळेही इथे पोहोचले आहेत. अनेक जण प्रॉपर्टीमध्ये हिस्स्याचे भांडण झाल्याने किंवा जबाबदारी टाळल्याने घराबाहेर पडले आहेत.” धोंडे यांनी यावेळी संवेदनशील निरीक्षण नोंदवत म्हटले, “आजच्या काळात समाजाच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. प्रत्येक माणसाची वेगळी कहाणी आहे. कोणाला नोकरी नाही, कोणाला आधार नाही. पण समाजाने थोडंसे मन उघडले तर अशा लोकांसाठी उपाय नक्कीच सापडतील. चुकीच्या गोष्टींना विरोध करणे, आणि दुर्बलांसाठी पुढे येणे — हेच खरी सामाजिक बांधिलकी आहे.”

