पात्र कंपनीला डावलून मर्जीतल्या कंपनीला काम; प्रकरण लाचलुचपत विभागाकडे
ठाणे : भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचे उघड झाले आहे. पात्र आणि अनुभवी कंपन्यांना डावलून पात्रता नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल २२ कोटी रुपयांचे काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
कोलशेत, माजिवडा आणि विटावा येथील मलप्रक्रिया केंद्रांच्या परिचलन, देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महापालिकेने सुमारे २२ कोटी रुपयांची निविदा काढली होती. या निविदेसाठी तोशिबा आणि एस.एस. इन्फ्रा या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, अनुभव नसलेल्या मे. ए. के. इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रा. लि. या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आले असल्याचे सोनावळे यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, वैयक्तिक निविदा मागवूनही संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम (जॉईंट व्हेंचर) दाखवून अर्ज दाखल केला होता. तरीदेखील महापालिकेने हे काम मंजूर केले, अशी माहिती अशोक सोनावळे यांनी दिली.
या संदर्भात महापालिकेचे उपअभियंता गुणवंत झांबरे यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे वर्ग केल्याने संशयाचे धुके अधिक दाटले आहे. त्यामुळेच आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असेही सोनावळे यांनी सांगितले.

