मासेमारी नौकांचा उद्घाटन सोहळा आज अमित शाह यांच्या हस्ते संपन्न

“खोल समुद्रात समृद्धीची लाट; सहकाराच्या माध्यमातून मच्छीमारांसाठी नवी दिशा

पुढील पाच वर्षांत दूध डेअरी, साखर कारखाने आणि बाजार समित्यांप्रमाणेच मत्स्य व्यवसायालाही संघटित तंत्र उपलब्ध करून देणार

मुंबई :- आगामी काळात भारतातील मत्स्य संपदा मोठ्या प्रमाणात वाढणार असून सहकारातून मत्स्य व्यवसायाला नवी गती मिळेल. या माध्यमातून छोट्या-मोठ्या मच्छीमारांना थेट फायदा होईल आणि त्यांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

खोल समुद्रातील मासेमारी नौकांचा उद्घाटन सोहळा आज अमित शहा यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी अमित शाहा यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात दोन मच्छीमार सोसायट्यांना मासेमारी नौकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय परिवहन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री पंकज भोयर, तसेच विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.

पुढील पाच वर्षांत दूध डेअरी, साखर कारखाने आणि बाजार समित्यांप्रमाणेच मत्स्य व्यवसायालाही संघटित तंत्र उपलब्ध करून देण्यात येईल, ज्यामुळे मच्छीमारांच्या आयुष्यात समृद्धी येईल, असे शहा यांनी सांगितले.

शहा म्हणाले की, मासेमारी नौकांच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय केल्यास त्याचा थेट फायदा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक मच्छीमाराच्या खिशात जाणार आहे. आणखी अशा 14 मासेमारी नौका देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, केंद्र सरकारच्या मत्स्य आणि सहकार विभागांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत 200 मासेमारी नौका मच्छीमार बांधवांना देण्यात येतील, असेही शहा यांनी नमूद केले.

या नौकांद्वारे तब्बल 25 दिवस खोल समुद्रात राहून मासेमारी करता येणार आहे. एकाच वेळी 20 टन मासे वाहून नेण्याची क्षमता या नौकांकडे आहे. समुद्रात समन्वय साधण्यासाठी इतर काही मोठ्या जहाजांचाही समावेश असेल, असे शहा यांनी स्पष्ट केले. या नौकांमध्ये राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे.

भारताची 11,900 किलोमीटर समुद्र सीमा आहे आणि अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. ही योजना सर्वसामान्य मच्छीमारांसाठी लाभदायी ठरेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

शहा म्हणाले की, दूध उत्पादन, मत्स्य व्यवसाय आणि भाजीपाला उद्योग हे सर्व सहकारावर आधारित आहेत, आणि यामुळे थेट फायदा सर्वसामान्य शेतकरी व मच्छीमारांना होतो. देशातील गरीब माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, तर देशही बलशाली बनेल, असे ते म्हणाले.

देशाच्या समृद्धीला फक्त जीडीपीच्या आकड्यांनी मोजले जात असले, तरी सामाजिक समृद्धी आणि मानवीय दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे शहा यांनी नमूद केले. “चांगले शिक्षण, सकस आहार आणि उत्तम आरोग्य सुविधा आत्मनिर्भरपणे निर्माण करता आल्या तरच देश समृद्ध होतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मानवीय दृष्टिकोनातून विकसित होणारा जीडीपी दर फक्त सहकाराच्या माध्यमातून शक्य आहे, असे सांगून त्यांनी महाराष्ट्रातील सहकार उद्योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

पद्मश्री पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराचा पाया रचला असून, साखर उद्योगामुळे राज्यातील प्रत्येक गाव समृद्ध झाले आहे, असे त्यांनी गौरवपूर्वक म्हटले.

ते पुढे म्हणाले की, गुजरात राज्यातील लाखो महिला अमूल उद्योगाच्या माध्यमातून तब्बल 80,000 कोटी रुपयांचा व्यवसाय करतात, आणि या व्यवसायाचा सर्व नफा थेट त्या महिलांनाच मिळतो. आता शिक्षित महिला देखील व्यावसायिक पातळीवर पशुपालनात येत आहेत. “सर्वसामान्यांच्या उत्कर्षाचा विचार हा आपल्या पूर्वजांचा आणि भारताच्या विचारधारेचा गाभा आहे,” असे शहा यांनी सांगितले.

मत्स्य व्यवसाय सहकाराच्या माध्यमातून राबवल्याने सर्वसामान्य मच्छीमारांच्या जीवनात आर्थिक बळ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच प्रोसेसिंग, एक्सपोर्ट आणि कलेक्शन करणाऱ्या जहाजांची योजना सुद्धा सहकाराच्या माध्यमातून राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत सरकार मत्स्य व्यवसायात तब्बल 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षेत्राशी संबंधित विविध योजना आखल्या आहेत.

२०१४-१५ मध्ये मत्स्य उत्पादन १०२ लाख टन होते, ते आता वाढून १९५ लाख टनांवर गेले आहे. घरगुती उत्पादन ६६ लाख टनांवरून १४७ लाख टनांवर गेले असून, मेरीटाइम उत्पादन ३५ लाख टनांवरून ४७ लाख टनांपर्यंत वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top