गणेश उत्सवानंतर सर्व भक्तजनांना आता वेध लागलेत ते नवरात्री उत्सवाचे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्री उत्सवासाठी ठाणे बाजारपेठ सज्ज झाली असून भक्तजनांनी तयारीच्या लगबगीत तुडुंब गर्दी केली आहे. ठाणे बाजारपेठेत देवीच्या स्वागतासाठी विविध कृत्रिम फुलांच्या माळी, रंगीन साड्या, पूजेचे साहित्य, फॅब्रिक व रेडीमेड देवी, फोल्डिंग देवी, पारंपरिक दागिने, कन्या पूजन साहित्य, देवीचे मुखवटे, कवड्यांच्या माळी, आधी वस्तूंनी ठाणेकर भक्तांचे मन मंत्रमुग्ध केले आहे.
दरम्यान या सर्व वस्तूंमध्ये ९ रंगी घाटासाठीची साडी - ₹100 ते 500, देवीचे साडे मुखवटे - ₹100 ते ₹2000 पर्यंत असून यामध्ये फायबर, ऍक्रेलिक, मेटल आणि पीओपी यापासून बनवलेले सुंदर आणि देखणे मुखवटे नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहेत. तसेच हिरे जोडीत मुखवटे देखील या ठिकाणी उपलब्ध झाले असून या मुखवट्यांमध्ये महालक्ष्मी, दुर्गामाता, कालिका माता, तुळजाभवानी, वैष्णव देवी, आधी अशा विविध देवींच्या मुखवटेंचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पारंपरिक देवीच्या भूषणांनी नागरिकांचे मन मंत्रमुग्ध केले असून या दागिन्यांमध्ये ठुशी - ₹60 ते ₹500, कोल्हापुरी साज- ₹60 ते ₹500, तन्मणी- ₹100 पासून, अंबाबाई चंद्रकोर मंगळसूत्र- ₹100, पुतळे हार- ₹260, लक्ष्मी हार- ₹90, राणीहार- ₹ 150, पोहे हार- ₹150, कैरी हार- ₹260, कंबरपट्टा- ₹ 100, नथ - ₹30, बाजूबंद - ₹60, नथनीची बिंदी- ₹ 60, कवड्यांची माळ- ₹108 ते ₹330, कानातले- ₹30, आदी असे विविध आकर्षक दागिने देखील नागरिकांसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत.
ठाण्यातील बाजारात देवीच्या सजावटीसाठी विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यात घरगृती घटस्थापनासाठी कमल आसन ₹400, फायबर हिरेजडित मुखवटे, कापडी, पीओपी व फायबरमध्ये रेडी मेड देवी, मार्गशीश वर्तसाठी वर लक्ष्मी (10 ते 18 इंच) ₹1200 ते ₹2200, सुहासिनीसाठी वाण सेट, आदी अश्या विविध रंगीबिरंगी व आकर्षक वस्तूंनी भाविकांचे मन वेढले आहे. तसेच देवीच्या सजावटीसाठी विविध वारकरी सेट, गोंधळी सेट, महा लक्ष्मी मुखवटा, बालाजी मुखवटा, आदी वस्तू बाजारात उपलब्ध झाल्याने भक्तांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लगबग सुरू केली असल्याचे श्रृंगार वस्तू भंडारचे विक्रेते स्वप्नील यांनी सांगितले.