जैन मंदिर ट्रस्टमधील खजिनदार अशोक कुमार सरदारल पारेख यांच्यावर सोमवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी 10.38 वाजल्याच्या सुमारास टेंभी नाका येथील नाकोडा ज्वेलर्स येथून पायी जात असताना एका टोळक्याने त्यांना भररस्त्यात अडवले. तुला जास्त मस्ती आलीय का असा जाब विचारात या टोळक्याने अशोक कुमार त्यांना चापटीने मारहाण केली. यावेळी अशोककुमार यांनी त्यांना पकड्ण्याचा प्रयत्न केला असता त्या हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याआधी ही त्यांना काही जणांनी मेसेज पाठवून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला दाद न दिल्याने आज त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जैन मंदिर ट्रस्टमधील काही पदाधिकाऱ्यांकडून हिशोबात हेराफेरी केली जात असून त्याचा पर्दाफाश करण्यासाठी अशोक कुमार यांनी आवाज उठवला होता. त्यासाठी त्यांनी ४० हुन अधिकवेळा पत्रव्यवहार करून हिशोबाबत माहिती मागितली होती. यावरून त्यांचे ट्रस्टमधील काही जणांसोबत वादही सुरू होते. त्यामुळे ट्रस्टमधीलच एखाद्या पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाला असावा असा अंदाज अशोककुमार यांनी वर्तवला आहे.
