.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे नवरात्र उत्सव २०२५ चा मंडप पूजन सोहळा आज अत्यंत भक्तिमय वातावरणात संकल्प चौक येथे पार पडला. शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रवींद्र फाटक यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून संकल्प प्रतिष्ठानकडून नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध रीतीने साजरा केला जात आहे.या वर्षीच्या नवरात्र उत्सवासाठी भव्य आणि आकर्षक मंडप उभारण्यात येणार असून त्याचे पूजन विधीवत पुजनाचार्यांच्या मंत्रोच्चारात पार पडले. यावेळी आमदार रवींद्र फाटक यांनी पूजन केले तसेच आरती संपन्न झाली.
गरबा आणि डांडियाचे रंगीबेरंगी कार्यक्रम हे संकल्प प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाचे खास आकर्षण असते. ठाण्यासह आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावत, पारंपरिक पोशाखात सजून-थजून गरब्याचा आनंद घेतात. या वर्षी देखील उत्तम प्रकाशयोजना, दर्जेदार संगीत, आणि सुरक्षेची चोख व्यवस्था यामुळे नागरिकांचा उत्साह अधिकच द्विगुणीत होणार आहे.
मंडप पूजन सोहळ्यावेळी संकल्प प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.