टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचे मंडप पूजन एकनाथ शिंदेंच्या हस्ते; आनंद दिघेंची परंपरा यंदाही कायम

ठाणे : गणेशोत्सवाचा जल्लोष संपताच ठाणेकरांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले असतानाच, टेंभी नाक्यावरील प्रसिद्ध श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्थ संस्थेच्या नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला असून याठिकाणी त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुर्गेश्वरी देवीच्या मंडप भूमिपूजनाची परंपरा सुरू केली. ही परंपरा यंदाही कायम असून मंडप पूजन विधी शनिवारी दुपारी मंडळाचे प्रमुख सल्लागार तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भवानी चौक, टेंभी नाका येथे करण्यात आले.

टेंभी नाक्यावरील अंबे मातेचा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. या उत्सवात शहरातील आणि शहराबाहेरील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी, नवस, संकल्प आणि मनोकामना पूर्तीसाठी देवीसमोर नतमस्तक होतात. दुर्गेश्वरी देवीच्या पूजनासोबतच दररोज महाआरती, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येथील दुर्गेश्वरी देवीची मूर्ती अत्यंत आकर्षक आणि कलात्मक असते. या मूर्तीची सजावट, मंडपाची रचना आणि रोषणाई पाहण्यासाठी ठाणे शहरासह मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली येथूनही भाविक येथे गर्दी करतात.

परंपरा आणि प्रथा आजही कायम
टेंभी नाक्यावरील हा नवरात्र उत्सव दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केला होता. त्यांनी या उत्सवाला केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले. त्यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मंडळाचे प्रमुख सल्लागार बनले आणि त्यांनी दिघेंनी सुरू केलेल्या सर्व परंपरा आणि प्रथा भावपूर्वक पुढे नेल्या.

भूमिपूजनानंतर मंडप उभारणी
गणेशोत्सवाच्या काळातच टेंभी नाका परिसरात नवरात्रोत्सवाच्या तयारीस सुरुवात होते. यामध्ये सर्वप्रथम देवीच्या पाटाचे पूजन होते. त्यानंतर, अनंत चतुर्दशीच्या दिवशी विधिवत मंडप भूमिपूजनाचा विधी पार पडतो. हा पूजनसोहळा म्हणजे नवरात्रोत्सवाच्या भव्य आयोजनाची सुरुवात मानली जाते. या भूमिपूजनानंतर मंडप उभारणीला प्रत्यक्ष प्रारंभ होतो, जो सुमारे १० ते १५ दिवसांपर्यंत चालतो.

अनंत चतुर्दशीला मंडप पूजन परंपरा
देवीचा मंडप उभारणीस पंधरा दिवसांचा दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी उत्सवाच्या मंडपाचे भूमिपूजन करण्याची प्रथा दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केली. दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे हे गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे पार पडत आहे. यंदाही त्या परंपरेचे पालन करत, शनिवार ६ सप्टेंबर रोजी दुपारी पूजन सोहळा संपन्न झाला आहे. टेंभी नाका येथील भवानी चौकात हा सोहळा संपन्न झाला

सदर प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर अशोक वैती, माजी नगरसेवक पवन कदम, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ.मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विलास जोशी, विभागप्रमुख कमलेश चव्हाण, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते, माजी नगरसेवक भूषण भोईर, टेंभीनाका शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि मंडळाचे कार्यकर्ते व भक्तगण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top