‘
ठाणे, दि. ९ : गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, ठाणे शहरातील सर्वात मोठ्या `रासरंग-२०२५’ उत्सवाचे आज भूमिपूजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर २२ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्रोत्सवाची मेजवानी मिळेल.
शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला शैलेश पुराणिक, माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहूल गंगर, गायक अंबर देसाई, कविता राम, तेजदान गढवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येईल. तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केले जाईल. यंदा सुमारे १२ हजारांहून अधिक गरबा प्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे.
ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्रोत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो. त्यामुळे मुंबई-ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात `रासरंग’चा समावेश झाला आहे, याबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी व माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केला. मुख्य कार्यक्रमाबरोबरच सामाजिक बांधीलकी म्हणून यंदा २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता विशेष मुलांसाठी दांडिया, २६ सप्टेंबर रोजी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि ३० सप्टेंबर रोजी भव्य आरती स्पर्धा होईल, असे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले.
रासरंग उत्सवाने दरवर्षी नवी उंची गाठली आहे. यंदाही महोत्सव यशस्वी होईल, अशा शब्दात खासदार नरेश म्हस्के यांनी उत्सवाला शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ वर्षांपूर्वी उत्सवाला सुरुवात झाली. दरवर्षी महोत्सवात नवनवीन उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढविण्यात आला. त्यामुळे मुंबई-ठाण्यात सर्वात मोठ्या नवरात्रोत्सव उत्सवात रासरंगचा समावेश आहे, अशी माहिती माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली.
चौकट
नवरात्रोत्सवात
ठाण्याचे `व्हिजन २०३०’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ठाणे शहराचा वेगाने विकास होत असून, पुढील पाच वर्षात विविध विकासकामांमुळे ठाणे शहराचा देशातील अव्वल शहरात समावेश होईल, असे नमूद करीत क्रेडाई-एमसीएचआय, ठाणेचे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी `व्हिजन २०३०’ साजरा केला जाणार असल्याचे नमूद केले. या वेळी लोगोचे अनावरण केले. ठाणे शहरात सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे, मेट्रो, बोरिवली भुयारी मार्गासह विविध रस्ते, वेगाने होणारा आर्थिक विकास आदींवर उत्सवाच्या माध्यमातून मुंबईसह महाराष्ट्राचे लक्ष वेधले जाणार आहे, असे सचिन मिराणी यांनी सांगितले.