ठाणे :कोलबाड मित्र मंडळ, ठाणे आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव २०२५ ‘कोलबाडचा राजा’ या उत्सवाचे हे ४४ वे वर्ष आहे. मंडळाने आजवर विविध संकल्पना घेऊन नयनरम्य, मनोरंजक आणि प्रबोधनात्मक देखावे श्री गणराया समोर सादर केले आहेत. दरवर्षी मोठ्या संस्थांकडून बक्षिसे मिळवण्यातही मंडळाने सातत्य राखले आहे. हे सर्व देखावे साकार करण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक संस्थांची मदत न घेता मंडळाचे बाळगोपाळ सदस्य, जागमाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिकांचा हातभार लागला आहे.
आमचा लाडका बाप्पा हा दाता आहे. बुद्धीदाता, ज्ञानदाता, सुखदाता आहे. दान करण्यासाठी मोठा पैसा अडका संपत्ती असायला पाहिजे असं नाही. ईश्वराने निर्माण केलेला हा मानवी देह, हा आपला स्वतःचा असतो. कोणतही दान सर्वश्रेष्ठ असते. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रक्तदान करून अनेक लोकांचे प्राण वाचवले असतील. रक्ताप्रमाणेच जिवंतपणे आपण काही अवयव दान करू शकतो. जसे की किडनी (मूत्रपिंड) तसेच, यकृताचा काही भाग हे जिवंतपणे दान केले जाऊ शकते. शस्त्रक्रियेनंतर काही कालावधीतच दाता पूर्ववत होतो. आपणा सर्वांना नेत्रदान माहीतच आहे. नेत्रदानाबरोबरच किडनी, लिव्हर, हृदय, यकृत याही अवयवांचे दान केले जाऊ शकते. आज समाजामध्ये कितीतरी रुग्ण किडनी, यकृत, हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत. लोकांनी याबाबत जागृत व्हावे यासाठी, सरकारही सकारात्मक आहे.
अवयवदानाच्या माहितीसाठी व प्रचारासाठी आम्ही कोलबाड मित्र मंडळ यावर्षी अवयव दानाचे आवाहन करत आहोत. मृत्यूनंतर आपल्या शवाची केवळ राख किंवा माती होण्यापेक्षा मानवी कल्याणासाठी त्या देहाचा उपयोग व्हावा अशी विचारधारा आज समाजावर रुजवण्याची गरज आहे आपला बाप्पा गजमुख आहे. हत्तीच्या डोक्याचे प्रत्यारोपण केल्यामुळे बाल गणेशाचा पुनर्जन्म झाला, बाप्पा गजानन झाला. मरणानंतरही हा देह अक्षय अविनाशी होण्यासाठी आम्ही आजच अवयव दान व देहदानाचे आवाहन करीत आहोत.
कोलबाड मित्र मंडळाचे
प्रमुख सल्लागार
श्री. राजु मोरे यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली.