ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्याच्या खाडीकिनारी साफसफाई सुरू असताना, कर्मचारीवर्गाला एका पिशवीत मतदार ओळखपत्रे व पॅन कार्ड मिळाले. ही माहिती मिळताच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील यांनी गणेशघाट परिसरात धाव घेतली. त्यांनी संबंधित कागदपत्रांचे फोटो-व्हिडीओ काढले आणि यातील काही मतदान कार्डांवरील पत्त्यांची चौकशी केली असता, तेथे कोणीही वास्तव्यास नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही ओळखपत्रे बोगस असल्याचे निष्पन्न झाले.
आज ठाणे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ही कार्डे 149 विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप थोरात यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रचंड संताप व्यक्त करत निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, “खा. राहुल गांधी गेली अनेक वर्षे वोट चोरीसाठी बोगस मतदार नोंदणी होत असल्याचे पुराव्यासकट सांगत आहेत. परंतु निवडणूक आयोग सतत डोळेझाक करून सरकारला पाठीशी घालत आहे. ठाण्यात घडलेली ही घटना त्याचे ठोस पुरावे देणारी आहे.”
पिंगळे पुढे म्हणाले, “ही बोगस ओळखपत्रे नेमकी कशी तयार झाली? त्यासाठी कोणते आधारकार्ड, रहिवाशी दाखले आणि मोबाईल क्रमांक सादर करण्यात आले? ही नोंदणी कोणत्या सायबर कॅफे किंवा आधारसेतूमार्फत करण्यात आली? याचा उपयोग नेमक्या कोणत्या निवडणुकांमध्ये झाला? या सर्व बाबींचा सखोल तपास झाला पाहिजे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीवर थेट आघात असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा लोकशाही ही केवळ नावापुरती राहील.”
या शिष्टमंडळात निलेश पाटील, मोतीराम भगत, वसीम सय्यद,यासीन मोमिन, रवींद्र कोळी , नूर्शिद शेख,हमीद शेख,रमेश सोनवणे,रोशन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची मागणी केली आहे.