परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाखांचे पारितोषिक केले जाहीर
ठाणे : प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात २०२५ मधील पहिले १० थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर देण्यात आले. हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आहे.
९ थरांपासून १० थरांपर्यंतचा प्रवास
यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर ९ थरांचा विश्वविक्रम घडला होता. आज त्या अभूतपूर्व विक्रमापेक्षा एक थर उंच जात कोकण नगर पथकाने नवा इतिहास घडवला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,
“गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. १० थरांचा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे, तर संपूर्ण देशाची शान आहे. खेळाडूंनी आपल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जगभरात ठसा उमटवला आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे साहेब यांची परंपरा आम्ही पुढे नेली. आजचा हा क्षण तर अत्यंत गौरवाचा आहे.”
संस्कृती युवा प्रतिष्ठान अध्यक्ष तथा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक म्हणाले,
“यापूर्वी आमच्या मंचावर ९ थरांचा विक्रम झाला होता. आज १० थरांच्या नव्या उंचीवर पोहोचल्याचा प्रचंड अभिमान आहे. कोकण नगरच्या गोविंदांनी मेहनत, जिद्द आणि शिस्त यांची सांगड घालत महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवला आहे. मला विश्वास होता की कोकणनगर विश्वविक्रम रचेल, माझा हा विश्वास सार्थ ठरला.”
तसेच जय जवान गोविंदा पथकाने ही 10 थर रचत विक्रम करत 5 लाखाचे बक्षीस मिळवले
सदर कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार, खासदार, व इतर मान्यवर तसेच मराठी हिंदी सिनेसृष्टी तील कलाकारांनी ही हजेरी लावली.