भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी मध्यरात्री १२ वाजता ठाणे शहराच्या मध्यवर्ती शाखेत ध्वजारोहण करण्याची परंपरा रुजवली. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर ही परंपरा कायम सुरू ठेवण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले.
परंतु यंदाचे ध्वजारोहण हे काही अनोखे आणि आकर्षक असे ठरले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेत दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यरात्री १२ वाजताच राष्ट्रध्वज फडकवून उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या जयघोषात स्वातंत्र्याचा गौरव साजरा केला.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला वंदन करताना देशभक्तीचा संदेश दिला आणि उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. परंतु यंदाचा हा ध्वजारोहण सोहळा हा खास ठरला.
यंदाच्या वर्षी स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव लागोपाठ आले आहेत. या दहीहंडी उत्सवानिमित्त शिवसेना (शिंदे गट) युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून ठाण्यातील प्रतिष्ठीत संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृती दहीहंडीसाठी यंदा खास स्पेनमधील १११ गोविंदा दाखल झाले आहेत. स्पेनच्या ‘कॅसलर्स’ पथकाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मानवी मनोरे रचून सलामी देत भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या अनोख्या क्षणाने उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू दाटून आले.
या ध्वजारोहण सोहळ्यास खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी महापौर अशोक वैती, शिवसेना ठाणे जिल्हा संघटीका सौ. मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर सौ. पल्लवी कदम यांसह शिवसेनेचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.