जिजाऊ स्मारकालाही मुख्यमंत्र्यांची मान्यता
खालिद का शिवाजीवर बंदी आणणार
ठाणे – ठाणे शहरातील माजिवडा येथील राष्ट्रध्वजाखाली छत्रपती संभाजी महाराज आणि घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना ठाणे महानगर पालिका आयुक्तांना करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.
सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आंब्रे, महेंद्र पाटील, अंकुश कदम आदींच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकल मराठा समाजाने केलेल्या अनेक मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आंब्रे यांनी सांगितले.
आंब्रे म्हणाले, खालिद का शिवाजी ह्या चित्रपटावर बंदी आणावी , यासाठी सकल मराठा समाजाने आंदोलन केले होते. त्यानंतर चित्रपटावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी कायमस्वरूपी करावी, या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली. समाजाने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत सहकार्य करण्याचीही तयारी फडणवीस यांनी दाखविली. तसेच, माजिवडा येथे पालिकेच्या वतीने शहरातील सर्वात भव्य तिरंगा ध्वज उभारला आहे. या ध्वजाच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधोरेखित करणारे स्मारक उभारण्यासाठी तसेच घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले असल्याचे रमेश आंब्रे यांनी सांगितले.
दरम्यान, संथगतीने चाललेल्या मराठा भवनाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबधितांना दिल्याचेही आंब्रे यांनी सांगितले.