• महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली माहिती
• महापालिका, पोलीस आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, विक्रेते यांची झाली बैठक
ठाणे - मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. तर, सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार आहेत. त्यामुळे कृत्रिम तलाव व फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आले. गेल्यावर्षीपेक्षा दीड पटीने जास्तीची विसर्जन व्यवस्था ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.
राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला गणेशोत्सव यंदाही दरवर्षीच्याच उत्साहाने साजरा करूया. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या आशिवार्दाने उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया, असे आवाहनही आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मंगळवारी महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव २०२५ आयोजनासाठी बैठकीचे आयोजन केले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, विक्रेते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलिस उपायुक्त प्रशांत कदम, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, महापालिका उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, दिनेश तायडे, सचिन सांगळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिका, महावितरण, टोरॅंट पॉवर, स्वंयसेवी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
*अतिरिक्त विसर्जन व्यवस्था*
मा. उच्च न्यायालयाचे आदेश आणि कृत्रिम तलावांकडे वाढणारा ओढा लक्षात घेऊन महापालिकेने यावर्षी अतिरिक्त विसर्जन व्यवस्था केली आहे. प्रभाग समितीनिहाय आणि पोलीस स्थानक निहाय होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकांमध्ये आणखी सूचना आल्यास त्याचाही समावेश विसर्जन व्यवस्थेत केला जाईल, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. गणेशभक्तांचा उत्साह वाढत असून त्याचबरोबरीने पर्यावरणविषयक जागरुकताही वाढत आहे. गेल्यावर्षी केलेल्या फिरत्या हौद विसर्जन व्यवस्थेचे नागरिकांनी स्वागत केले. त्यामुळे यावर्षी त्यात वाढ करून पथकांची संख्या १५ करण्यात आली आहे, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.
यावर्षी २४ कृत्रिम तलाव, ७४ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरत्या विसर्जन व्यवस्था, ०९ घाट विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३२ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे. गतवर्षी एकूण ८८ विसर्जन व्यवस्था होत्या.
*दोन सत्रात स्वतंत्र मनुष्यबळ*
विसर्जनाच्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. ती लक्षात घेऊन मनुष्यबळ वाढवण्यात येईल. तसेच, दोन सत्रात मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे कार्यक्षमतेत सुधारणा होईल, असा विश्वास आयु्क्त राव यांनी व्यक्त केला. घाट विसर्जनस्थळी क्रेन आणि वाढीव बार्ज असावेत, अशी सूचना गणेशोत्सव समन्वय समिती आणि पोलिसांनी केली आहे. त्याबाबत विचार करण्याचे आश्वासनही आयुक्त राव यांनी दिले.
*समन्वय अधिकारी*
गणेशोत्सव मंडळ, पोलीस यांना महापालिकेकडून काही व्यवस्था हवी असल्यास किंवा व्यवस्थेत काही त्रुटी असल्याच त्याचे निराकरण करण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात येत आहे. उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे हे महापालिकेकडून त्यासंदर्भातील समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील, असेही आयुक्त राव यांनी या बैठकीत सांगितले. स्थानिक पोलिस, मंडळाचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी यांनी आपापल्या भागातील विसर्जन व्यवस्थेची संयुक्त पाहणी करावी. त्यात लक्षात येणाऱ्या बाबींची नोंद घेऊन स्थानिक सहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले.
*विसर्जन व्यवस्थेचे विकेंद्रीकरण*
एकाच ठिकाणी विसर्जनासाठी गर्दी होऊ नये म्हणून महापालिकेने जास्तीचे कृत्रिम तलाव नियोजित केले आहेत. तसेच, मंडळांनी नवरात्रौत्सवाच्या काळात होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा मांडला असून त्याबाबत महापालिका प्रशासन दक्ष राहील, असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले.
प्रशासन आणि गणशोत्सव मंडळ यांनी एकत्रितपणे समन्वयाने सण साजरा करू. कार्यकर्तेच प्रशासनाचे कान, नाक, डोळे आहेत. स्थानिक पोलीस स्टेशन जेव्हा मंडळांच्या बैठका घेतील तेव्हा सर्व यंत्रणांचे स्थानिक अधिकारीही तेथे उपस्थित राहतील, असे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी स्पष्ट केले.
बैठकीच्या प्रारंभी, पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाचे आदेश, त्याअनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेली कार्यपद्धती याची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. तसेच, ठाणे महापालिकेने संपूर्ण विसर्जन व्यवस्थेची माहिती देणारे हरित विसर्जन ॲप तयार केले आहे. ते लवकरच नागरिकांसाठी सर्व मोबाईल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याचेही प्रधान यांनी सांगितले.
बैठकीत, मंडळांच्या वतीने विसर्जन व्यवस्थेबाबत ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे उपाध्यक्ष रवींद्र पालवे, उल्हास बर्डे, विनायक सुर्वे, वासुदेव अलगुज, विकी चॅको, विशाल महाडिक आदींनी विविध मुद्दे मांडले.