मंगळागौर स्पर्धेतून रणरागिणींना मानवंदना
ठाणे | दिनांक ४ ऑगस्ट २०२५
श्रावणातील मंगलमय वातावरणात विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व मा. नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मंगळागौर स्पर्धा-२०२५, शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अत्यंत उत्साही आणि पारंपरिक वातावरणात पार पडली. या भव्य स्पर्धेत ठाण्यासह ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील २० महिला सांघिक गटांनी “रणरागिणी” या प्रेरणादायी संकल्पनेवर मंगळागौर सादर केली. यावेळी पारंपरिक व आधुनिक (फ्युजन) या दोन प्रकारांत मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
एका छोट्या प्रमाणात सुरु झालेली ही मंगळागौर स्पर्धा आज एका भव्य स्तरावर पोहोचली आहे. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने आयोजिल्या जाणाऱ्या या मंगळागौर स्पर्धा उपक्रमाने दरवर्षी नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. यंदा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त “रणरागिणी” ही संकल्पना मंगळागौर स्पर्धेसाठी देण्यात आली होती. या संकल्पनेच्या अनुषंगाने प्रत्येक गटाने सादरीकरणातून जिजाऊ, अहिल्यादेवी, झाशीची राणी, ताराराणी यांच्यासारख्या विविध रणरागिणींचे प्रभावी चित्रण आपल्या कलेतून सादर करून मानवंदना दिली.
या मंगळागौर स्पर्धेची सुरुवात संस्कृती फाऊंडेशनच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गणेशवंदनेने झाली. परीक्षक म्हणून डॉ. ज्योती सावंत, त्रुषाली फडळे, सायली शिंदे आणि सुमित निषाद यांनी जबाबदारी पार पाडली. परिषा सरनाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांच्या आरोग्यासंदर्भात कॅन्सर प्रतिबंधाबाबत मार्गदर्शन केले व ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्रत्येक महिला संघाने रणरागिणी संकल्पनेला अनुसरून परंपरा व सामाजिक जागृती या दोहोंचा संगम साधून अतिशय ऊर्जेने आपली कला सादर केली. विशेष म्हणजे डवलेनगर येथील श्री स्वामी समर्थ ग्रुपमधील ६० वर्षांवरील ज्येष्ठ महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे त्यांची कला सादर केली.
या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक, अभिनेत्री शर्मिला शिंदे, शिवाली परब, अनाहिता सरनाईक, शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे, ठाणे जिल्हा महिला प्रमुख मिनाक्षी शिंदे, माजी उप-महापौर पल्लवी कदम, उपजिल्हा प्रमुख वंदना डोंगरे, महिला आघाडीच्या अनिता बिर्जे, तसेच विमल भोईर, निशा पाटील, साधना जोशी, नम्रता घरत, उषा भोईर, कल्पना पाटील, आशा डोंगरे, मालती पाटील, एकता भोईर, सुखदा मोरे, निर्मला कणसे आणि जयश्री डेव्हिड या माजी नगरसेविका उपस्थित होत्या. याशिवाय मिरा-भाईंदर महिला जिल्हा प्रमुख निशा नार्वेकर आणि शहर प्रमुख पूजा आमगावकर यादेखील यावेळी उपस्थित होत्या. तसेच रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेटचे माजी अध्यक्ष नासीर शेख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शिवप्रिया शंकर हे देखील उपस्थित होते.
निकालाची चौकट
पारंपरिक गट:
▪️ प्रथम क्रमांक: अहिल्याबाई ग्रुप, शिवाईनगर
▪️ द्वितीय क्रमांक: सखी कलानृत्य ग्रुप, लोकमान्यनगर पाडा नं. २
▪️ तृतीय क्रमांक (संयुक्त):
– सईबाई ग्रुप, लोकमान्यनगर पाडा नं. ३
– श्री. स्वामी समर्थ ग्रुप, डवलेनगर
▪️ उत्तेजनार्थ: श्री. स्वामी समर्थ ग्रुप, शिवाईनगर
आधुनिक (फ्युजन) गट:
▪️ प्रथम क्रमांक: सुकुर स्वामिनी ग्रुप, सुकुर रेसिडेन्सी, घोडबंदर
▪️ द्वितीय क्रमांक: गजगौरी मंगळागौर ग्रुप, कासारवडवली, घोडबंदर
▪️ तृतीय क्रमांक: लक्ष्मीनारायण ग्रुप, लक्ष्मीनारायण रेसिडेन्सी
▪️ उत्तेजनार्थ: कुलस्वामिनी ग्रुप, चिराग नगर
सुपरस्टार ऑल ओव्हर ग्रुप: – नीलकंठ गौरी ग्रुप, नीलकंठ पाम्स
प्रतिक्रिया –
“मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीला प्रेरणा मिळावी, परंपरेचा सन्मान व्हावा व आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा आमचा उद्देश आहे. यंदाची रणरागिणी थीम प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजली. हीच आमच्यासाठी खरी यशाची पावती आहे.”
- परिषा प्रताप सरनाईक,