ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने दूर करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा

खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे

ठाणे – ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यात येत असलेल्या अपयशाबद्दल स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.

ठाण्यात कोपरी, माजिवडा यासोबत घोडबंदर रस्ता, गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल, शिळफाटा परिसर येथे सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्याबद्दलच्या तक्रारी वारंवार येत असून सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा पूर्ण परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत दिले.

या बैठकीस ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट आदी अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांना दुरघ्वनीव्दारे सूचना दिल्या.

गायमुख घाटातील रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत असून या समस्येवर अजूनही तोडगा काढण्यात यश आलेले नाही. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

त्याचबरोबर, वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करून ठाणे, भिवंडी, शिळफाटा आणि कोपरी या चारही भागातील वाहतूक कोंडीवर मात करावी. रस्ते दुरुस्ती करताना त्या कामाचा दर्जा चांगला असावा. रस्त्यावर दुरुस्तीचे उंचवटे तयार होऊ नयेत. त्याने अपघात होतात, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. खड्डे मुक्ती झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. त्यामुळे उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरून खड्डे मुक्ती करावी, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top