प्रत्येक मेट्रो स्थानकाखाली राखीव प्रवासी थांबा तयार करा‌ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

ठाणे: (४ ऑगस्ट) कापुरबावडी ते घोडबंदर मार्गावरील ८ मेट्रो स्थानकाच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत. जेणेकरून प्रवाशांना मेट्रो मधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल ! अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्या. ते मेट्रो स्थानके व त्या अनुषंगिक विविध विकास कामांच्या पहाणी दौऱ्याच्या अनुषंगाने बोलत होते. यावेळी ठाणे महापालिका , मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण , वाहतूक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की ५-६ वर्षापूर्वी ठाणे मेट्रो चे काम सुरू झाले तेव्हा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्याच्या बाजूला होता. परंतु घोडबंदर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की सध्याचा सेवा मार्ग हा मुख्य रस्त्यामध्ये विलीन करावा जेणेकरून घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटू शकेल! त्या अनुषंगाने ६०० कोटी रुपये अतिरिक्त निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. सदर काम पावसाळ्यानंतर सुरू करून या वर्षाअखेरीस पूर्ण करावे अशा देखील सूचना मंत्री सरनाईक यांनी या वेळ केल्या. तथापि ,सेवा मार्ग व मुख्य रस्ता याच्या मधोमध मेट्रोचे स्थानकाचे जिने उतरत असल्यामुळे ते भविष्यात प्रवाशांना धोकादायक ठरू शकतील, अशा तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्या. या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून तोडगा काढण्यासाठी या दौऱ्याचे नियोजन केले होते. सध्या सेवा मार्ग मुख्य रस्त्याशी जोडला जात असल्यामुळे रस्त्याची रुंदी वाढलेली आहे. परंतु जिथे मेट्रो स्थानक आहे, तेथे प्रवासी उतरण्या च्या जिन्यालगत प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे सदर सेवा मार्ग हा त्या प्रवाशांसाठी स्वतंत्र थांबा म्हणून विकसित करावा अशी मागणी पुढे आली. त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी प्रत्येक मेट्रो स्थानकाच्या खाली सेवा मार्ग आरक्षित करून तेथे प्रवाशांना पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करावी जेणेकरून एसटी बस, शहर बस आणि रिक्षा व टॅक्सी या वाहनाखेरीज इतर वाहने या मार्गावरून येऊ नयेत. अशा प्रकारचे सूचनाफलक मुख्य रस्त्याच्या बाजूला लावण्यात यावेत! अशा देखील सुचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उपरोक्त सूचनाचे अनुषंगाने केलेले बदल वाकथ्रू च्या माध्यमातून १५ ऑगस्ट पर्यंत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपणास दाखवण्यात यावेत व त्यांच्या अनुमतीने पुढील काम सुरू करावे असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करा

दरम्यान मेट्रोस्थानके व त्या अनुषंगाने इतर कामाची पाहणी मंत्री सरनाईक यांनी केली.यावेळी संपूर्ण घोडबंदर रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करावा अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसे पत्र ठाणे महापालिकेने संबंधिताना द्यावे असे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top